दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या टोळीला अटक
सौंदत्ती पोलिसांची चार महिन्यांनंतर कारवाई : साडेआठ लाखांहून अधिक ऐवज जप्त
बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक डी. एस. धर्मट्टी, उपनिरीक्षक आनंद क्यारकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून 58 ग्रॅम 260 मिलीची सोन्याची चेन, 35 ग्रॅम 100 मिलीचे सोन्याचे कडे, 2 ग्रॅम 100 मिलीचे लॉकेट, दरोड्यासाठी वापरण्यात आलेली टमटम ऑटोरिक्षा, एक मोटारसायकल, चार मोबाईल संच असा 8 लाख 68 हजार 165 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 24 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सौंदत्तीजवळील संगप्पनकोळ्ळा परिसरात मोटारसायकलवरून जाणाऱ्या अशोक बसाप्पा बागेवाडी, रा. सौंदत्ती याला अडवून जांबियाचा धाक दाखवून रॉडने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर त्या टोळीने त्याच्या अंगावरील दागिने पळविले होते. चार महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.