For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूरच्या वृद्धाला साडेसहा लाखांचा गंडा

11:06 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहापूरच्या वृद्धाला साडेसहा लाखांचा गंडा
Advertisement

सायबर गुन्हेगारांची करामत : विमानतळावर ड्रग्जचे पार्सल आल्याची बतावणी

Advertisement

बेळगाव : ‘तुमच्या नावे अमलीपदार्थांचे पार्सल आले आहे’ असे सांगत सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीने नार्वेकर गल्ली, शहापूर येथील एका वृद्धाला साडेसहा लाख रुपयांना गंडविले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून शहर सायबर क्राईम पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. ‘विमानतळावर तुमच्या नावे पार्सल आले आहे. यामध्ये 20 पासपोर्ट, 3 क्रेडिट कार्ड व 50 ग्रॅम एमडीएम ड्रग्ज आहे. त्यामुळे तुमची चौकशी करावी लागणार आहे’, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी त्या वृद्धाशी संपर्क साधला. ‘लखनौ येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करा’, असे सांगून एकाच्या हातात फोन देण्यात आला. पलीकडच्या व्यक्तीने ‘आपण सायबर क्राईम विभागातून बोलतो. तुमच्या नावे एमडीएम ड्रग्जचे पार्सल आले आहे’, असे सांगत वृद्धाला घाबरविण्यात आले. प्रकरण मिटविण्यासाठी म्हणून या वृद्धाकडे पैशांची मागणी करण्यात आली. एकदा 3 लाख 55 हजार 500 रुपये व आणखी एकदा 2 लाख 80 हजार रुपये असे दोनवेळा भामट्यांच्या बँक खात्यात 6 लाख 35 हजार 500 रुपये जमा करण्यात आले. भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर आपण फसलो गेलो, हे संबंधित वृद्धाच्या लक्षात आले. मंगळवारी शहर सायबर क्राईम विभागात अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजीव कांबळे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

20 दिवसांपूर्वीच सावध करूनही...

Advertisement

‘ड्रग्ज तस्करीत गोवण्याची धमकी!’ या मथळ्याखाली दि. 16 जानेवारी रोजी ‘तरुण भारत’ने ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. बेळगाव परिसरातील राजकीय नेते, सरकारी अधिकारी व वेगवेगळ्या संघटनांच्या काही प्रमुखांशी संपर्क साधून ‘तुमच्या नावे विमानतळावर पार्सल आले आहे. या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत’ असे सांगत लुटण्याचे प्रयत्न सुरू होते. यासंबंधी ‘तरुण भारत’ने नागरिकांना अशा गुन्हेगारी टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते.

Advertisement
Tags :

.