सावंतवाडी पालिकेच्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य
सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या बॅ.नाथ पै सभागृहाच्या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालिकेचे कर्मचारी नियमित साफसफाई करत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असा आरोप तेथील काही व्यापाऱ्यांनी केला असून याबाबत तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. येथील नगरपालिका कार्यालयाला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह बंद करून ते नाथ पै सभागृहाच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहात सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर स्वच्छतागृह हलविण्यास स्थानिक व्यापारी व नागरिकांचा विरोध होता. परंतु स्वच्छतेचे कारण पुढे करून पालिका प्रशासनाने ते स्वच्छतागृह त्या ठिकाणी हलवले . मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण आहे. अशाच परिस्थिती त्या ठिकाणी स्वच्छता वापरणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून ते वापरावे लागत आहे . विशेष म्हणजे बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या दवाखान्यात येणाऱ्या नागरिकांनी व रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत तेथील व्यापा-यांशी संपर्क साधला असतात पालिकेचे कर्मचारी नियमित साफसफाई करीत नाहीत त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे असे त्यांचे म्हणणे त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.