मृतांना पत्र लिहिण्याचा प्रकार
मुलीच्या अनोख्या पुढाकाराची पार्श्वभूमी
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीने केलेल्या कामाची कुणी कल्पनाही करू शकत नव्हते. ही मुलगी स्वत:च्या आजीआजोबांना पत्र लिहू इच्छिते. परंतु या दोघांचाही मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत या मुलीला अनोखी कल्पना सुचली. तिच्या या कल्पनेवर आता सर्वत्र अंमलबजावणी सुरू झाली आहे. याकरता देशभरातील दफनभूमींमध्ये पोस्ट बॉक्स बसविण्यात आले असून त्यांना ‘पोस्ट बॉक्स टू हेवन’ नाव देण्यात आले आहे. शोकाकुल परिवार स्वकीयांना पत्र लिहून या पोस्टबॉक्समध्ये टाकू शकतात.
या मुलीचे नाव मटिल्डा हँडी असून ती दिवंगत आजीआजोबांच्या आठवणींनी व्याकुळ झाली होती. यातूनच तिला ही अनोखी कल्पना सुचली आहे. आपल्याप्रमाणेच इतर लोक देखील स्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण काढत असतील असा विचार करून मटिल्डा ही स्वत:च्या आईसोबत नॉटिंगहममध्ये गेडलिंग दफनभूमी येथे गेली, तिथे तिने मांडलेल्या कल्पनेला पसंती मिळाली होती.
नाताळावेळी या पोस्टबॉक्सला पांढऱ्या आणि सोनरी रंगात रंगविण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर गूड न्यूज मूव्हमेंट नावाच्या पेजनुसार अशाप्रकारचे 40 हून अधिक पोस्ट बॉक्स इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये बसविण्यात आले आहेत. आता लोक नाताळावेळी निधन झालेल्या स्वकीयांना कार्ड पाठवू शकतात. मटिल्डा हँडीच्या कल्पनेने प्रेरित होत बेडफोर्डमध्ये नॉर्स रोड दफनभूमीत एक नवा पोस्ट बॉक्स बसविण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर अशाप्रकारच्या बॉक्ससाठी रहिवाशांकडून अनेक अर्ज प्राप्त झाले होते असे बेडफोर्ड बॉरो कौन्सिलकडून सांगण्यात आले. आपल्या मुलीच्या कल्पनेला देशभरात पसंत केले जात असल्याने मटिल्डाच्या आईने आनंद व्यक्त केला आहे.