आंबेनळी घाटातील खड्ड्यांत झेंडा
प्रतापगड :
महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावर आंबेनळी घाटात मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिलेला आहे. रस्त्यात पडलेल्या मोठाल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षा उपाय म्हणून खड्यात बादली ठेवून त्यावर झेंडा लावून सुरक्षेचा उपाय केला आहे. निष्क्रीय प्रशासनाने तातडीने खड्डे दुरुस्त करावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
- पर्यटनस्थळ की खड्यांचे साम्राज्य ?
महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ, तर प्रतापगड हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ. मात्र, या दोन्ही ठिकाणांना जोडणारे रस्ते पाहिले की प्रश्न पडतो, आपण पर्यटनासाठी आलो आहोत की खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करण्यासाठी?
क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा मार्ग देखील खड्ड्यांच्या विळख्यात आहे. प्रतापगडकडे जाणारा आंबेनळी घाटही सुस्थितीत नाही; एका वळणावर तर खड्डे इतके खोल आहेत की, प्रवाशांना ते नजरेसही पडत नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज यांच्याकडेच पर्यटन खात्याचा कार्यभार आहे. साताऱ्याचेच शिवेंद्रसिहराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
महाबळेश्वर-वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. इतके सारे मंत्री एका जिल्ह्यात असताना महाबळेश्वर-प्रतापगडसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या शहराला जोडणाऱ्या मार्गांची अशी दुरवस्था का? असा प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनांचे फुगे फुगवायचे आणि प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्य, ही वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे
महाबळेश्वर व प्रतापगड हे फक्त भाषणांत पर्यटनाचा अभिमान म्हणून वापरण्याची जागा नाही. जर रस्त्यांची दुरवस्था अशीच कायम राहिली, तर पर्यटकांचा विश्वास उडेल आणि जिल्ह्याची बदनामीही होईल. प्रशासन व मंत्रीमंडळाने आता तरी जनतेचा आक्रोश ऐकून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे.
- स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचा रोष स्पष्ट आहे
"मंत्रिमहोदय दरवेळी विकासाच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावर फिरले तरी समजेल, हा रस्ता आहे की खड्यांचे साम्राज्य ? आमच्या सुरक्षेचा, पर्यटकांच्या सोयीचा विचार कधी होणार?", अशी विचारणा स्थानिक नागरिक करु लागले आहेत.