बटाट्यासारखा दिसणारा मासा
सरड्याप्रमाणे बदलतो रंग
काँगो पफरफिश अत्यंत अजब मासा आहे. जेव्हा हा मासा स्वत:चे पोट फुगवून आकार वाढवतो, तेव्हा तो बटाट्यासारखा दिसतो. हा मासा सरड्याप्रमाणे रंगही बदलू शकतो. याच्या अनोख्या आकारामुळे याला पटेटो पफरफिश या नावाने देखील ओळखले जाते, हा मासा गोड्या पाण्यात आढळतो.
काँगो पफर गोड्या पाण्यातील मासा असून तो मध्य आफ्रिकन देश कांगोतील काँगो नदीतच आढळतो. याचे शास्त्राrय नाव टेट्राओडॉन मियुरस आहे. हा मासा 6 इंचापर्यंतच्या आकाराचा असतो. यात टेट्रोडोटॉक्सिन न्यूरोटॉक्सिन आढळून येते. परंतु हे विष केवळ हा मासा गिळला तरच मानवी रक्तप्रवाहात शिरू शकते.
शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी कांगो पफरफिश हवा किंवा पाण्याने स्वत:चे पोट फुग्याप्रमाणे फुगवून घेत असतो. हा मासा स्वत:ला वाळूत दाबून ठेवतो. दीर्घकाळापर्यंतच अशाच अवस्थेत राहून तो शिकारीची प्रतीक्षा करतो आणि मग घात लावून हल्ला करत असतो. पटेटो पफरफिश अधिक सक्रीय राहणारा मासा नाही. हा मासा बहुतांशकाळ वाळूत दाबून राहणे पसंत करतो.
शिकारीपासून लपण्यासाठी हा मासा स्वत:चा रंग देखील बदलत असतो. या माशाला पहिल्या नजरेत ओळखणे सोपे नसते. कारण यात सरड्याप्रमाणे स्वत:च्या स्थितीनुसार रंग बदलण्याची क्षमता असते. हा मासा मांसाहारी असल्याने त्याला एकटे ठेवण्यात येते. कारण अॅक्वेरियममध्ये याच्यासोबत अन्य छोट्या माशांना ठेवल्यास तो त्यांची शिकार करतो. तसेच मोठ्या माशांचे पंखही तो कापू शकतो.