छत्रपती शिवाजी महाराजांवर येणार चित्रपट
ऋषभ शेट्टी साकारणार भूमिका
दक्षिणेतील दिग्गज अभिनेता ऋषभ शेट्टीने कांतारा या चित्रपटाद्वारे देशभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. ऋषभ सध्या स्वत:च्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. याचदरम्यान ऋषभ आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांकडून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून ऋषभचा फर्स्ट लुक देखील सादर करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह करणार आहेत. संदीप यांनी यापूर्वी भूमि, मैं अटल हूं आणि सरबजीत यासारख्या चित्रपटांच्या निर्मितीत योगदान दिले आहे. ऋषभने छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटाची अधिकृत पुष्टी करत भारतीय इतिहासातील या वीर योद्ध्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणे गर्वाची बाब असल्याचे म्हटले आहे.
ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. कांतारा या चित्रपटाच्या अपार यशानंतर ऋषभ शेट्टीच्या कारकीर्दीला एक नवी उंची मिळाली आहे. आगामी काळात तो अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यात कांतारा प्रीक्वेल आणि जय हनुमान या चित्रपटांचा समावेश आहे. कांतारा पार्ट 1 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.