दादासाहेब फाळकेंवर येणार चित्रपट
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. यावेळी तो प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानींसोबत काम करणार आहे. दोघेही मिळून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित बायोपिक घेऊन येत आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा काही काळापूर्वी करण्यात आली होती.
चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम ऑक्टोबरपासून तर चित्रिकरण जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. याचा मोठा हिस्सा मुंबईत चित्रित केला जाणार आहे. आमिर खानचा लुक उघड होऊ नये याची काळजी सेटवर घेतली जाणार आहे. चित्रिकरणादरम्यान सेटवर येणाऱ्या लोकांच्या हालचालींवर पूर्ण नजर ठेवली जाणार आहे.
चित्रपटात फाळके यांच्या खऱ्या आयुष्याशी निगडित ठिकाणांना विस्तृतपणे रिक्रिएट केले जाणार आहे. मुंबईच्या दादर येथील मथुरा भवनपासून नाशिकपर्यंत फाळके यांचे वास्तव्य होते. प्रेक्षकांना त्या काळातील वातावरण पूर्णपणे खरे भासावे म्हणून अत्यंत मोठा सेट उभा करण्याची तयारी सुरू आहे. आमिर खानचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट 30 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच दिवशी दादासाहेब फाळके यांची 157 वी जयंती देखील आहे. परंतु अद्याप याविषयी अधिकृत पुष्टी झालेली नाही. आमिर आणि राजकुमार यांच्या जोडीने यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘पीके’ या चित्रपटांकरता एकत्र काम केले होते.