एपीजे अब्दुल कलामांवर येणार चित्रपट
धनुष पडद्यावर साकारणार ‘मिसाइल मॅन’
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारतात सर्वात सन्मानित राष्ट्रपती होते यात कुठलाच संशय नाही. भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ असलेले कलाम यांचे प्रेरित करणारे जीवन आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दिग्दर्शक ओम राउत हा कलाम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारणार असून यात मिसाइल मॅन यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष साकारणार आहे.
साधेपणाने जीवन जगणारे आणि देशासाठी निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले होते. वयाच्या 84 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले हेते. अब्दुल कलाम हे प्रख्यात वैज्ञानिक होते, त्यांच्या विचारांनी प्रत्येक पिढी प्रेरित होत असते. ओम राउतने कलाम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनिल सुनकर मिळून करणार आहेत. तर याची पटकथा सैयवान क्वाद्रास लिहिणार आहेत.
धनुषने 2013 साली रांझणा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘शमिताभ’ चित्रपटात काम केले होते. अतरंगी रे हा त्याचा मागील हिंदी चित्रट होता. तर चालू वर्षात त्याचे कुबेरा, इडली कडई, तेरे इश्क में आणि धनुष 56 हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.