शेतीच्या पाणी पट्टी मध्ये हेक्टरी भरमसाठ केलेल्या वाढीविरोधात लवकरच लढा उभारावा लागणार : राजू शेट्टी
पुलाची शिरोली प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण (पाणीपुरवठा) विभागाने चालू हंगामापासून नदीतील पाणी पट्टी वाढ हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये इतकी केली आहे. या विरोधात लवकरच लढा उभारावा लागणार आहे. या लढाईत पक्ष गट तट बाजूला ठेवून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
मागील ऊस दराचा दुसरा हप्ता व चालू हंगामात वाढीव दर मिळावा यासाठी माजी खासदार शेट्टी यांनी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते .हा दराचा तिढा न सुटल्यामुळे शेट्टी यांनी गुरुवारी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोलीतील दर्ग्यासमोर चक्काजाम आंदोलन केले होते . यावेळी बोलताना शेट्टी यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचा समाचार घेतला.शासनाने शेतीच्या पाणी पट्टी मध्ये हेक्टरी भरमसाठ वाढ केली असल्याचे खात्रीशीर समजते.
मागील वर्षी हेक्टरी १३२५ इतकी पाणी पट्टी आकारणी होती. पण सध्या यामध्ये भरमसाठ वाढ केली आहे हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये इतक्या आकारणीच्या नोटिसा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या लवकरच शेतकऱ्यांना लागू होतील असे समजते. ही अन्यायी दरवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. तसेच त्यांना मोठी आर्थिक झळही सहन करावी लागणार आहे .त्या विरोधात आपणास लवकरच पुणे येथील जलसंधारण (पाणीपुरवठा) कार्यालयावर धडक द्यावी लागणार आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले आहे.
साखर सम्राटांना इशारा!
शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची रक्कम (बील)शासनाने साखर कारखान्याच्या ऊस बिलातून संम्मतीविना परस्पर कपात करु नये. दांडगाव्याने वसुल केल्यास साखर सम्राटांना सोडणार नाही असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिला.