पर्थ कसोटीसाठी वेगवान खेळपट्टी
धोकादायक खेळपट्टीने टीम इंडियाचे होणार स्वागत : क्युरेटरकडून खुलासा
वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पर्थच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर खेळावे लागणार आहे. खेळपट्टीवर गवत असल्याचे सांगत क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड यांनी टीम इंडियासाठी अप्रत्यक्ष धोक्याचा इशारा दिला आहे. उभय संघातील पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवली जाणार आहे.
पर्थ स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर मॅकडोनाल्ड म्हणाले, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी खेळपट्टीत पुरेसा वेग आणि उसळी असेल. यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे. पर्थच्या या खेळपट्टीवर मी वेग आणि चांगला बाउन्स सेट करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी ज्या प्रकारची खेळपट्टी तयार केली होती, त्याच प्रकारची खेळपट्टी तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात केवळ 89 धावांवर गारद झाला होता आणि ऑस्ट्रेलियाने 360 धावांनी मोठा विजय नोंदवला होता. साधारणपणे खेळपट्टीवर 10 मिमी पर्यंत गवत सोडण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पहिल्या सत्रापासूनच चेंडूला उसळी मिळणार असून वेगवान गोलंदाजांना याची खूप मदत होईल. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्यामुळे हा सामना नक्कीच रोमांचकारी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणारा हा चौथा सामना आहे. या स्टेडियमवर पहिली कसोटीही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होती. डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने नॅथन लियॉनच्या आठ विकेट्सच्या जोरावर 146 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने पहिल्या डावात 123 धावा केल्या होत्या. आतापर्यंत या स्टेडियमवर झालेल्या चारही सामन्यात कांगांरुनी बाजी मारली आहे. ऑप्टसच्या या खेळपट्टीवर भारत की ऑस्ट्रेलिया यापैकी कोण बाजी मारणार हे पहावे लागले.
ऑस्ट्रेलियन माध्यमांचा माईंड गेम, टीम इंडियाचे अनोखे वेलकम
पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच चुरस राहिली असून यंदा मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलच्यादृष्टीने या मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमधील पहिल्या पानांवर भारतीय खेळाडूंचे फोटो झळकल्याने सर्व चकित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन मीडियाने चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या वृत्तपत्र व माध्यमांतून हिंदी, पंजाबीमधून बातम्या, जाहिराती देण्यात आल्या आहेत. विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंतसारख्या खेळाडूंचे पोस्टर छापण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर आणि क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धच्या मालिकेतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे. ‘द डेली टेलिग्राफ‘ने विराट कोहलीचा मोठा फोटो छापत या मालिकेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. याशिवाय यशस्वी जैस्वालचाही फोटो छापला असून पंजाबीमध्ये ‘द न्यू किंग‘ असे लिहिले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा थरार हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपेक्षा कमी नसल्याचे वर्तमानपत्राच्या या कव्हरेजवरून स्पष्ट होते.
जैस्वाल, पंत, राहुलचा सरावावर भर
ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर मंगळवारी यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत व केएल राहुल यांनी नेट्मध्ये सरावावर भर दिला. हे तिघे वगळता अन्य भारतीय फलंदाज सराव सत्रात दिसले नाहीत. दिग्गज खेळाडू विराट कोहलीही पर्थमध्ये दाखल झाला आहे. पण सरावाला त्याची अनुपस्थिती चाहत्यांसाठी हिरमोड करणारी ठरली.