For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मधमाशांच्या हल्ल्यात माविनकट्टी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

06:40 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मधमाशांच्या हल्ल्यात माविनकट्टी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

बाळेकुंद्री  :

Advertisement

बेळगाव तालुक्यातील माविनकट्टी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.  झाडावर असलेले मधमाशांचे मोठे पोळे अचानक तुटून खाली पडले व मधमाशांच्या भीषण हल्ल्यात 76 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बसय्या बसवनय्या परर्वनावर असे मधमाशांच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने माविनकट्टी गावात शोककळा पसरली आहे.  बसय्या हे शुक्रवारी जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी आपल्या शेताकडे गेले होते. एका झाडावर असलेले मधमाशांचे पोळे अचानक खाली पडल्याने मधमाशांनी आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घातला. या हल्ल्यात शेतात असलेले अनेकजण जीव वाचविण्यासाठी धावत सुटले. मात्र, बसय्या मधमाशांच्या विळख्यात अडकले. मधमाशांनी त्यांच्या अंगावर अक्षरश: झुंडीने हल्ला केला. गंभीर स्वरुपाचे डंख त्यांच्या गालावर, कानावर, डोक्यावर, तसेच शरीराच्या इतर भागात बसल्यामुळे ते जागेवरच बेशुद्ध पडले. यावेळी सांबरा गावचे मजूर करड कापण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. त्यांनी तात्काळ माविनकट्टीच्या नागरिकांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांना इस्पितळात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने माविनकट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत असून परर्वनावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बसय्या यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा असा परिवार आहे.मारिहाळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.