पॉवर टिलरमध्ये पाय अडकून काकतीतील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
वार्ताहर/काकती
पेरणी करताना पॉवर टिलरमध्ये पाय अडकून एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी काकतीजवळील शिवारात ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सिदराई ओमाण्णा टुमरी (वय 64) राहणार होळी गल्ली, काकती असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पॉवर टिलर मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे पुढील तपास करीत आहेत.
सिदराई यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी दुपारी सिदराई व मुलगा ज्ञानेश्वर हे पेरणीसाठी कडोली रोडवरील आपल्या शेतवडीत गेले होते. पॉवर टिलरने पेरणी करताना मशीनमध्ये अडकलेला चिखल पायाने काढताना पाय अडकून ते गंभीर जखमी झाले. या घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पेरणीच्या वेळी पॉवर टिलर चालवणाऱ्या नागराज सिदराई बागेवाडी याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री सिदराई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पेरणी करताना वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.