बुडणाऱ्या विदेशी पर्यटकाला वाचविले
जीवरक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक
कारवार : बंदी असूनही इटलीचा तो 83 वर्षीय वृद्ध पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात उतरला आणि लाटांच्या विळख्यात सापडून गटांगळ्या खाऊ लागला. तथापि, समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेल्या जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडणाऱ्या विदेशी पर्यटकाला वाचविले. ही घटना बुधवारी सायंकाळी गोकर्ण जवळच्या कुडले बीचवर घडली. जॉर्ज (वय 83, रा. इटली) असे वाचविण्यात आलेल्या पर्यटकांचे नाव आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून शेकडो पर्यटक गोकर्ण परिसरातील बीचवर रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकून आहेत. हे विदेशी पाहुणे पोहण्यासाठी समुद्रात उतरतात. यापकी कांहीजण पट्टीचे जलतरणपटू असले तरी वेळ सांगून येत नाही. सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यावर बंदी आहे. तरी सुद्धा काहीजण धैर्य दाखवितात आणि अडचणीत येतात. बुधवारी सायंकाळी गटांगळ्या खाणाऱ्या जार्ज यांच्या मदतीला जीवरक्षक नागेंद्र कुर्ले, प्रदीप अंबीग आणि शेखर हरीकंत्र धावून आले नसते तर दुर्घटना घडली असती.
आठ जणांना वाचविण्यात यश
दरम्यान गेल्या आठवड्यात गोकर्ण परिसरातील समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्या आठ पर्यटकांना जीवरक्षकांनी जीवदान दिले आहे. यामध्ये रशियन महिला पर्यटकांचाही समावेश आहे.