हरमित देसाईला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ कॅराकेस (व्हेनेझुएला)
येथे नुकत्याच झालेल्या 2024 च्या विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या फिडर कॅराकेस स्पर्धेत भारताचा टेबल टेनिसपटू हरमित देसाईने दुहेरी मुकुट संपादन केला. हरमितने या स्पर्धेत पुरुष एकेरीतील जेतेपद पटकाविले. तसेच त्याने मिश्र दुहेरीत कृत्विका रॉय समवेत अजिंक्यपद मिळविले.
या स्पर्धेत हरमित देसाईची कामगिरी दर्जेदार झाली. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात हरमित देसाई आणि कृत्विका रॉय यांनी क्युबाच्या जॉर्ज कांपोस आणि डॅनिला कॅरेझेना यांचा 8-11, 11-9, 11-8, 9-11, 11-5 अशा 3-2 सेट्समध्ये पराभव केला. हरमित आणि कृत्विका यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या कैबो आणि झिन रेन यांचा पराभव केला. कृत्विका रॉयचे गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीतील हे दुसरे विजेतेपद आहे. तिने कॅलिगेरी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत यशस्वीनी घोरपडेसमवेत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
फिडर कॅराकेस विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मुदीत दानीचे मिश्र दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. मुदीत दानीने मिश्र दुहेरीत बुटमेलाच्या लुसिया कोरडेरोसमवेत आपला सहभाग दर्शविला होता. त्याचप्रमाणे महिला एकेरीत कृत्विका रॉयला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत भारताच्या हरमित देसाईने फ्रान्सच्या जो सिप्रेडचा 11-7, 11-8, 11-6 अशा 3-0 सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले.