चेन्नईत सेंच्युरीचा डबल धमाका, बांगलादेशसमोर 515 धावांचे टार्गेट
रिषभ पंत-शुभमन गिलची शतके : तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या 4 बाद 158 धावा
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर तिसरा दिवस रिषभ पंत व शुभमन गिल या जोडीने गाजवला. दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला व बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे टार्गेट दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अर्धशतकी सलामी दिली पण त्यानंतर गोलंदाजांनी विकेट्स मिळवत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. आता रविवारी भारताला हा सामना जिंकण्यासाठी सहा विकेट्स मिळवाव्या लागतील. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात काळे ढग आल्याने अंधार झाला, यावेळी खराब हवामानामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला. यावेळी बांगलादेशने 4 बाद 158 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस कर्णधार नजमुल शांतो 51 व शकीब अल हसन 5 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, शुभमन गिल व पंतने शनिवारच्या दिवसाची सुरुवात भन्नाट केली. गिलने संयमी खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पंत यावेळी चांगलाच आक्रमक खेळत होता. पंतने शुक्रवारी आपले इरादे स्पष्ट केले होते, त्यानंतर शनिवारी पंतने जलद गतीने धावा जमवायला सुरुवात केली. उपहारानंतर दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पंतने कसोटीतील सहावे शतक झळकावताना 128 चेंडूत 13 चौकार व 4 षटकारासह 109 धावा केल्या. शतकानंतर पंत जास्त काळ खेळू शकला नाही आणि तो 109 धावांवर बाद झाला. यानंतर गिलने आपले पाचवे कसोटी शतक साजरे केले. त्याने 176 चेंडूत 10 चौकार व 4 षटकारासह नाबाद 119 धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. गिल व पंतच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 64 षटकांत 4 बाद 287 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला व बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले. गोलंदाजीत बांगलादेशकडून सर्वाधिक मेंहदी हसन मिराजने 2 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाला विजयासाठी 6 विकेट्सची गरज
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली. बुमराहने 17 व्या षटकात ही भागीदारी तोडली आणि यशस्वी जैस्वालने झाकीर हसनचा गलीमध्ये अप्रतिम झेल घेतला. झाकीरने 33 धावा केल्या. यानंतर चेपॉकच्या मैदानावर अश्विनच्या फिरकीची कमाल पहायला मिळाली. शादमान इस्लामला 35 धावांवर बाद करत अश्विनने भारताला दुसरे यश मिळवून दिले. अनुभवी मोमिनल हक व मुशफिकुर रहीम हे दोघेही अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाले. यानंतर कर्णधार शांतो व शकीब अल हसनने आणखी पडझड होऊ दिली नाही. शांतोने अर्धशतकी खेळी साकारत संघाचे दीडशतक फलकावर लावले. दरम्यान, शेवटच्या सत्रात बांगलादेशचा संघ 4 बाद 158 धावांवर फलंदाजी करत होता, यावेळी अचानक चेन्नईमधील हवामान बदलल्याने सामना थांबवण्यात आला. खराब हवामानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. दिवसअखेरीस शांतो 60 चेंडूत 51 तर शकीब 5 धावांवर खेळत होता. भारताकडून अश्विनने सर्वाधिक 3 तर बुमराहने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 376 व दुसरा डाव 64 षटकांत 4 बाद 287 धावांवर घोषित (जैस्वाल 10, रोहित शर्मा 5, विराट 17, शुभमन गिल नाबाद 119, रिषभ पंत 109, केएल राहुल नाबाद 22, मेहदी हसन मिराज 2 बळी)
बांगलादेश पहिला डाव 149 व दुसरा डाव 37.2 षटकांत 4 बाद 158 (झाकीर हसन 33, शादमान इस्लाम 35, नजमुल हुसेन शांतो नाबाद 51, मोमीनल हक 13, शाकीब अल हसन खेळत आहे 5, अश्विन 63 धावांत 3 बळी, बुमराह 1 बळी).
कमबॅक कसोटीत पंतचा मास्टरस्ट्रोक
रिषभ पंतने चेन्नई कसोटीमध्ये दमदार कमबॅक केले आहे. 2022 मध्ये दिल्लीहून डेहराडूनला जाताना रिषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून जवळपास 634 दिवसानंतर भारताकडून कसोटी खेळण्यासाठी रिषभ चेन्नईच्या मैदानावर उतरला. बांगलादेश विरूद्ध कसोटीत दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीने भारतासाठी 90 कसोटी सामने खेळले, यामध्ये त्याने सहा शतके केली. मात्र, पंतने अवघ्या 34 कसोटीतच 6 शतके झळकावण्याची किमया केली आहे.
कसोटीत सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय यष्टीरक्षक
रिषभ पंत 6 शतके (58 डाव)
महेंद्रसिंह धोनी 6 शतके (144 डाव)
वृद्धिमान साहा 3 शतके (58 डाव)
गिलचा धमाकेदार शतकी खेळीसह अनोखा विक्रम
चेन्नई कसोटीत गिलने 161 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 5 वे शतक आहे. या शतकी खेळीसह त्याने अनोखा विक्रम देखील नोंदवला. 2022 सालापासून त्याचे हे 12 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. अशाप्रकारे, तो 2022 नंतर सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने बाबर आझम, विराट कोहली आणि जो रुट यांना मागे टाकले आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके करणारा गिल (5 शतके) दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने मयांक अगरवाल, रिषभ पंत व विराट कोहली (प्रत्येकी 4 शतके) यांना मागे टाकले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतके रोहित शर्मा (9 शतके) च्या नावे आहेत.
सर्वाधिक शतक करणारे फलंदाज (2022 पासून)
12 शतके - शुभमन गिल
11 शतके - बाबर आझम
11 शतके - जो रूट
10 शतके - विराट कोहली.
जैस्वालचा अफलातून झेल
बांगलादेशच्या झाकीर हसन आणि शादमान इस्लाम या जोडीने स्वत:ला सेट केले होते आणि ते सहज धावा काढत होते. टीम इंडियाला विकेटची नितांत गरज होती आणि यशस्वीने अप्रतिम झेल घेत भारताला हे यश मिळवून दिले. डावातील 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराहने झाकीर हसनला चकवले आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन गलीमध्ये गेला. यशस्वी गलीमध्ये उभा होता. मात्र, चेंडू यशस्वीच्या डावीकडे होता आणि खूप खाली होता. पण तेवढ्यात जैस्वालने डावीकडे वळून चेंडू मेदानावर पडण्यापूर्वी हातात घेतला आणि झाकीरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.