बाहुल्यांचा चाहता असणारा इसम
लाखो रुपये खर्च करत निर्माण केला संग्रह
बाहुल्यांचा संग्रह करण्याचा छंद असणाऱ्या अनेक महिलांविषयी तुम्हाला माहिती असेल. परंतु एका पुरुषाला देखील अशाप्रकारचा छंद आहे. क्रिस हेन्री नावाचा हा इसम मागील 10 वर्षांपासून जुन्या बाहुल्यांचा संग्रह करत आहे. त्याच्याकडील बाहुल्या अत्यंत भीतीदायक असल्याचे लोकांना वाटते, परंतु या बाहुल्यांना चुकीचे समजले जाते आणि माझ्या मनात त्यांची देखभाल करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत असते असे क्रिसचे सांगणे आहे. लाखोंच्या किमतीचा झालेला हा संग्रह आता अनेकार्थाने अनोखा ठरला आहे.
सध्या 26 वर्षांचा असलेला क्रिस बालपणापासून बाहुल्यांच्या सान्निध्यात आहे. 16 वर्षे वय असताना त्याने पहिली विंटेज डॉल खरेदी केली होती. आता त्याच्याकडे 250 पेक्षा अधिक जुन्या डॉल्स असून त्यांची किंमत सुमारे 2.5-3.5 लाख रुपयांदरम्यान आहे. या सर्व डॉल्स त्याने खास खोलीच्या कॅबिनेटमध्ये डिस्प्लेसाठी ठेवल्या आहेत.
बालपणापासून स्वत:च्या बहिणीसोबत बाहुल्यांसोबत खेळत मी लहानाचा मोठा झालो आहे असे अमेरिकेच्या न्य जर्सी, पॅरामस येथे राहणाऱ्या क्रिसने सांगितले आहे. पहिली विंटेज म्हणजेच जुनी बाहुली वयाच्या 16 व्या वर्षी खरेदी केल्यावर हा छंद निर्माण झाला. मी या जुन्या भीतीदायक आणि तुटलेल्या बाहुलीला पाहिले आणि तिच्या प्रेमात पडलो असे क्रिस सांगतो.
क्रिस आता स्वत: विविध ठिकाणी फिरत जुन्या बाहुल्या मिळवत असतो. या बाहुल्या 1900 पासून 1950 च्या दशकाच्या काळातील आहेत, त्यांची किंमत 4-9 हजार रुपयांदरम्यान आहे. क्रिसला प्रवासाची आवड असून त्याने आतापर्यंत 20 देशांना भेट दिली आहे. जेथे तो जातो तेथून बाहुल्या मिळविण्याचा प्रयत्न तो करतो. त्याच्याकडे घाना, दक्षिण आफ्रिका, भारत आणि फ्रान्समधील बाहुली आहे. या बाहुल्या तो विकण्यासाठी खरेदी करत नाही. प्रत्येक बाहुलीशी माझे एक नाते तयार होते, माझ्यासाठी प्रत्येक बाहुली खास आणि अनमोल असल्याचे क्रिसचे सांगणे आहे.