आठ आमदारांविरुद्धची एक अपात्रता याचिका फेटाळली
डॉम्निक नरोन्हा यांनी सादर केली होती याचिका : अजून दोन याचिका प्रलंबित आठ आमदारांना
पणजी : काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात प्रवेश केलेले आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा व ऊडाल्फ फर्नांडिस या आठ आमदारांच्या विरोधात काँग्रेसचे नेते डॉम्निक नरोन्हा यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. ही अपात्रता याचिका काल सोमवारी निकाली काढताना सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावल्याने आता काँग्रेसच्या फुटीर आठही आमदारांना या याचिकेत दिलासा मिळाला आहे. अजून दोन याचिका प्रलंबित आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या या दोन याचिकांवर सभापती तवडकर यांनी अजून कोणताही निर्णय दिलेला नाही.
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन : पाटकर
डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील काल सोमवारी झालेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी आहे. सभापतींनी या निकालाने आपले वेगळे रंग दाखवायला सुरवात केली आहे. कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने जनतेच्या जोरावर आपण विश्वासघात करणाऱ्या आमदारांना धडा शिकवणार आहे. यापुढे पक्षांतर करण्यास धैर्य होणार नाही यासाठी आपण योग्य ती कायदेशीर तरतूद करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपणास आशा आहे की आठ फुटीर आमदारांविरुद्ध आपण दाखल केलेल्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
सभापतांचा निवाडा योग्यच : कामत
मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले की, सभापतींचा हा निवाडा योग्यच आहे. आपल्या सहीत इतर आमदारांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे याविषयी तेच अधिक भाष्य करू शकतील, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले. हा निवाडा योग्य असल्याचे आपण मानतो असे कामत यावेळी म्हणाले.
आठ आमदारांना काही दिवसांचा दिलासा
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांविऊद्धच्या याचिकेवरील सुनावणी काल सोमवारी सभापतींसमोर झाली. त्यातील प्रतिवादी आठ आमदारांना बाजू मांडण्यासाठी येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तसेच याचिकादार चोडणकर यांना जोड याचिका दाखल करण्यास 22 ऑक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. चोडणकर यांनी सादर केलेल्या याचिकेवर 24 व 25 ऑक्टोबर रोजी पुढील सुनवाणी होणार असल्याचे चोडणकर यांचे वकील अभिजित गोसावी यांनी सांगितले.