मुक्यांनाही बोलकं करणारं उपकरण
वोकल कार्ड म्हणजेच गळा खराब झाल्याने अनेक जणांना बोलता येत नाही. किंवा बोलताना समस्या उद्भवते. जगात सुमारे 10 लाखाहून अधिक लोकांना बोलता येत नाही. अनेक मुलांमध्ये ही समस्या जन्मजात असते. म्हणजेच जन्मापासूनच त्यांचे वोकल कॉर्ड आवाज निघेल इतपत खुलत नाही. यामुळे ते जन्मभर बोलू शकत नाहीत. परंतु आता अशा लोकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. वैज्ञानिकांनी असे उपकरण तयार केले आहे, ज्याच्या मदतीने वोकल कॉर्ड खुलणार आहे. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये 12 मार्च रोजी प्रकाशित अहवालानुसार पॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक असा पॅच तयार केला आहे, जो बाहेरून गळ्यात लावला जाणार आहे. हे लवचिक उपकरण गळ्यातील स्नायूंच्या हालचाली टिपणार असून त्यांना आवाजात रुपांतरित करणार आहे. म्हणजे गळ्यातून आवाज निघत नसला तरीही तुम्ही बोलू शकाल. सर्वात खास बाब म्हणजे या उपकरणासाठी कुठलीही बॅटरी किंवा प्लगची गरज भासणार नाही. हा हालचालींचा वापर करून स्वत:साठी ऊर्जा निर्माण करणार आहे.
उपकरण तयार करणाऱ्या टीमचे नेतृत्व प्राध्यापक जून चेन करत आहेत. एकदा मी व्याख्यान देत होतो, अनेक तासांपर्यंत बोलल्यावर माझ्या गळ्यात शक्ती राहिली नसल्याचे जाणवले, तेव्हाच जोरात बोलावे लागू नये असे काही तरी निर्माण करण्याचा विचार सुचला. त्यानंतर या कल्पनेवर काम सुरू केले, तेव्हा निष्कर्ष चकित करणारे होते. या उपकरणाच्या मदतीने वोकल कॉर्डला हानी न पोहोचविता बोलता येणार आहे. आम्ही या उपकरणाला वोकल फोल्ड हे नाव देत आहोत असे जून यांनी सांगितले आहे.
आवाज पुन्हा परतणार
जे लोक बोलण्याची क्षमता गमावून बसले आहेत, त्यांच्यासाठी हे उपकरण रामबाण ठरणार आहे. त्यांचा आवाज पुन्हा परतू शकणार आहे. गळ्याच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक लोकांचा आवाज जात असतो. त्यांच्यासाठी हे उपकरण अत्यंत सहाय्यभूत ठरणार आहे. कुठल्याही समस्येशिवाय ते बोलू शकणार आहेत. लोह आणि गॅलियमच्या मदतीने हा पॅच तयार करण्यात आला आहे. यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आल्यावर तो चुंबकीय गुणधर्म प्रकट करू लागतो. नवा पॅच याच तंत्रज्ञानावर काम करतो. स्नायूंमध्ये आंकुचन किंवा फैलाव झाल्यास तो याचा वापर करत आवाज तयार करतो आणि त्यांना सिग्नल्समध्ये बदलतो, जो नंतर आवाजाच्या स्वरुपात बाहेर येतो असे प्राध्यापकांनी सांगितले.
पॅचची निर्मिती
हा पॅच 5 अत्यंत पातळ आवरणांनी तयार करण्यात आला आहे. बाहेरील आवरण अत्यंत नरम, लवचिक सिलिकॉनने तयार करण्यात आले आहे. मधले आवरण सिलिकॉन आणि मायक्रोमॅग्नेटने निर्मित असून ते एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. हा गळ्यातील स्नायूंच्या गतीसोबत बदलत राहतो. याच्या चहुबाजूला तांब्याच्या तारांनी निर्मित दोन आवरणं आहेत, या चुंबकीय क्षेत्र परिवर्तनांना इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये परिवर्तित करते. संशोधनात सामील लोकांनी 5 वाक्यांचा 100 वेळा पुनरुच्चार केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 95 टक्के आवाज अत्यंत अचूक राहिला आहे.