इच्छामृत्यूसाठी तयार केले यंत्र
झोपताच होणार मृत्यू
ईश्वराकडून प्राप्त झालेले हे जीवन जगातील सर्वात मोठी भेट आहे. या जगात जिवंत राहून आम्ही स्वत:साठी, आसपासच्या लोकांसाठी आणि निसर्गासाठी खूप काही करू शकतो. परंतु काही लोक अवघड जीवनासमोर लवकर हार मानतात आणि ते संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या हा काही समस्यांवरील उपाय नाही. परंतु आता धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येला सोपे करण्यासाठी स्वीत्झर्लंडमध्ये एका वादग्रस्त यंत्राचा वापर केला जाणार आहे. ज्यात झोपल्यावर माणसाचा 10 मिनिटात मृत्यू होईल आणि त्याला कुठलाही त्रास होणार नाही. परंतु आता या यंत्रावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
स्वीत्झर्लंडमध्ये सुसाइड पॉडचा वापर करण्याचा विचार सुरू असून त्याचे नाव सार्को आहे. उपचाररहित आजारामुळे इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्या लोकांसाठी हे यंत्र आहे. 2019 मध्ये व्हेनिस डिझाइन फेस्टिव्हलमध्ये सर्वप्रथम हे यंत्र सादर करण्यात आले होते. हे एकप्रकारचे 3डी प्रिंटेड कॅप्सूल आहे.
या यंत्रात एक बटन दाबताच आतमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वेगाने वाढते आणि केवळ 5 सेकंदात ऑक्सिजनअभावी माणूस बेशुद्ध पडतो आणि 10 मिनिटात त्याचा वेदनेशिवाय मृत्यू होतो. स्वीत्झर्लडची द लास्ट रिजॉर्ट संस्था इच्छामृत्यूच्या बाजूने आवाज उठविते. या पॉडमुळे कुठलेच नुकसान नाही आणि ते सहजपणे वापरले जाऊ शकते. स्वीत्झर्लंडमध्ये इच्छामृत्यूला कायदेशीर अनुमती आहे. परंतु स्वीस क्रिमिनल कोडच्या अनुच्छेद 115 नुसार असिस्टेड सुसाइड असा गुन्हा आहे, जो स्वार्थी कारणांमुळे केला जातो.
अत्यंत स्वस्त मृत्यू
केवळ 20 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1600 रुपयांमध्ये लोकांना ही सेवा दिली जाईल आणि याकरता किमान वय 50 वर्षे असणे आवश्यक आहे. जर एखादा 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल आणि तो गंभीर आजारी असेल तर त्यालाही या सेवेचा वापर करता येणार आहे. अनेक लोकांनी या यंत्राबद्दल विचराणा केली असून याचा लवकरच वापर होऊ शकेल असे लास्ट रिजॉर्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पहिला वापरकर्ता कोण असणार आणि मृत्यूचे ठिकाण कोणते असेल हे ठरविण्यात आलेले नाही, अन्यथा हा विषय प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचेल आणि एखाद्याची शांततेत मरण्याची इच्छा संपविली जाईल. एखाद्याच्या खासगी मालमत्तेवर आणि एखाद्या सुंदर ठिकाणी याचा वापर होईल. याचा पहिला वापरकर्ता चालू वर्षी समोर येणार असल्याचे लास्ट रिजॉर्टच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या वकील फिओना स्टीवर्ट यांनी सांगितले आहे. तर अनेक जण या यंत्रावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, त्यांच्यानुसार या यंत्राचा वापर अनैतिक आहे, या यंत्राच्या वापरादरम्यान डॉक्टराची उपस्थिती आवश्यक नाही. अशा स्थितीत कुणी जाणूनबुजून एखाद्याचा जीव घेऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.