भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये घसरण
मुंबई :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. 11 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा 10.746 अब्ज डॉलर्सने कमी होत 690.43 अब्ज डॉलर्स वर राहिला होता. सदरच्या आठवड्यातील घसरण ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण असल्याची माहिती समोर येते आहे. भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये देखील विदेशी चलन साठा घसरणीत राहिला होता. 4 ऑक्टोबरच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 3.709 अब्ज डॉलर्सने कमी झाला होता. दुसरीकडे सप्टेंबर अखेरच्या आठवड्यामध्ये मात्र विदेशी चलन साठ्याने 704.885 अब्ज डॉलर्सचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
सुवर्णसाठाही घसरला
विदेशी स्थावर मालमत्ता साठादेखील 10.542 अब्ज डॉलर्सने घटत 602 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे. याचप्रमाणे देशाचा सुवर्ण साठा देखील 98 दशलक्ष डॉलर्सने कमी होत 65.658 अब्ज डॉलर्सवर घसरला होता.