‘बीएसएनएल’च्या 50 हजार 4-जी साइट्स
केंद्रीय दळणवळण मंत्रालयाची माहिती : सध्या 41 हजारांहून अधिक साईट्स कार्यरत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने देशात 50 हजार 4 जी साइट्स स्थापित केल्या आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, यावर्षी 29 ऑक्टोबरपर्यंत बीएसएनएलने 50 हजारांहून अधिक साइट्स स्थापित केल्या आहेत आणि त्यापैकी 41 हजारांहून अधिक साइट्स अद्याप कार्यरत आहेत. प्रकल्पाच्या 9.2 व्या टप्प्यात सुमारे 36,747 साइट्स स्थापन करण्यात आल्या आहेत. 4 जी प्रकल्पांतर्गत डिजिटल इंडिया फंडाद्वारे प्रदान केलेल्या निधीसह 5,000 साइट्सची स्थापना करण्यात आली आहे. याला पूर्वी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) असे म्हटले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की पुढील वर्षी जूनपर्यंत 1 लाख साइट्स स्थापित केल्यानंतर, बीएसएनएलची 4 जी सेवा देशभरात सुरू केली जाईल आणि एका महिन्याच्या आत 5 जी मध्ये रूपांतरित केली जाणार आहेत. ऑपरेटरने 5 जी रेडिओ अॅक्सेस नेटवर्क (आरएएन) आणि 3.6 जीझेडएच आणि 700 एमएचझेड फ्रिक्वेन्सी बँडमध्ये कोर नेटवर्कसाठी चाचणी पूर्ण केली आहे.