अर्थसंकल्पावरून महापालिकेत रंगला कलगीतुरा
सत्ताधारी-विरोधी गटात दुमत; अर्थसंकल्पाबाबत कल्पना नसल्याने नाराजी : लवकरच पुरवणी अर्थसंकल्प करणार सादर
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेची अर्थसंकल्पीय बैठक महापालिका सभागृहात शनिवारी पार पडली. मात्र यावेळी काळजीवाहू महापौर सविता कांबळे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्यामुळे मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र सरकार नियुक्त सदस्यांसह विरोधी गटातील काही नगरसेवकांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आपल्याला काही सूचना करायच्या होत्या, पण महापौर कक्षात चर्चेसाठी आम्हाला बोलावले नाही, तर काही नगरसेवकांनी अर्थसंकल्पाची आपल्याला कल्पनाच नसल्याचे सांगितले. त्यामुळे नियोजित अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पुन्हा पुरवणी अर्थसंकल्प सादर करू, असे सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांनी स्पष्ट केले. काळजीवाहू महापौर सविता कांबळे यांनीदेखील होकार दर्शविला.
महापालिकेच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पाबाबत यापूर्वी शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व नगरसेवकांची बैठक आयोजित करून मते आजमावण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी महापौर कक्षात सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांची चर्चा होऊन अर्थसंकल्पावर एकमत झाले होते. शनिवारी महापालिका सभागृहात अर्थसंकल्पीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर सविता कांबळे यांनी अर्थसंकल्प सादर केला जात असून त्याला सर्वानुमते मंजुरी द्यावी, असे सभागृहाला सूचित केले. त्यानंतर अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्ष नेत्रावती भागवत यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाची प्रत महापौरांना देण्यात आली.
सरकार नियुक्त नगरसेवक रमेश सोंटक्की म्हणाले, महापालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेली ही बैठक विशेष सभा आहे की सामान्य हे आधी स्पष्ट करावे. महापौर, उपमहापौर निवडणुकीला का विलंब होत आहे, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यानंतर कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी महापालिकेकडून सरकारला पत्र पाठविण्यात आले होते. सरकारकडून आलेल्या खुलाशानंतरच ही बैठक घेण्यात आली आहे. कलम 168 नुसार अर्थसंकल्पीय बैठक घेण्यात येत आहे, असे सांगितले. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना करायच्या होत्या. मात्र आम्हाला महापौर कक्षात बोलाविण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला.
सरकारनियुक्त सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी देखील आपली खदखद व्यक्त केली. सरकारनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार वगळता लोकनियुक्त नगरसेवकांप्रमाणेच इतर सर्व अधिकार आहेत, याची कल्पना बहुतेक जणांना नाही. त्यामुळे कौन्सिल सेक्रेटरींनी सरकारनियुक्त सदस्यांच्या अधिकारांची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर महापौर सविता कांबळे यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांसह काही नगरसेवकांनी एकत्र बसून चर्चा केली असल्याचे सांगितले. मात्र याला आक्षेप घेत विरोधी गटातील नगरसेवक अजिम पटवेगार यांनी विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांनी आपल्याला अर्थसंकल्पाची कल्पना दिली नाही, असा आरोप केला. आपल्या प्रभागात अनेक समस्या असून त्या कशा सोडवाव्यात, मतदार आमच्यावर प्रश्नांचा भडिमार करत आहेत, असे सांगत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर लवकरच पुरवणी अर्थसंकल्प सादर करू, असे आश्वासन दिले. याला महापौर सविता कांबळे यांनी सहमती दर्शविल्याने सर्वानुमते अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.