इस्रायलमध्ये ‘गाय’च ठरली हेर
लोकांवर नजर ठेवत असल्याचा दावा
तुम्ही आजवर हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींबद्दल ऐकले असेल, परंतु कधी हेरगिरी करणाऱ्या गायीबद्दल ऐकले आहे का? हेरगिरी करणाऱ्या या गायींना स्पाय काउज म्हटले जात आहे. याकरता रितसर या गायींना प्रशिक्षण दिले जाते, या गायींचे काम ग्रामस्थांवर नजर ठेवणे आहे. गायींकडून हेरगिरी करविण्याची किमया इस्रायलने साधली आहे. इस्रायलकडून गायींच्या मार्फ पॅलेस्टिनी ग्रामस्थांवर नजर ठेवली जाते. परंतु या दाव्याची इस्रायलच्या यंत्रणाकडून पुष्टी करण्यात आलेली नाही.
खिरबेट यानुन गावातील वृद्ध रुश्द मोरार यांना एक गाय फिरताना दिसून आली होती. ही गाय हेरगिरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. इस्रायल आणि त्याचे सहकारी स्थानिक लोकांवर पाळत ठेवण्यासाठी या गायींची भरती करत असून त्यांना प्रशिक्षण देत असल्याचा दावा त्यांनी केला. खिरबेट यानुनमध्ये मोठ्या आणि छोट्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी गाईच्या गळ्यात एक मेडलसारखी गोष्ट अडकवली जाते, ज्यात ऐकणारे आणि रिकॉर्ड करणारे उपकरण असते आणि कधीकधी कॅमेराही असतो असे त्यांचे सांगणे आहे.
इस्रायलकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी गायींचा वापर होत असल्याचा दावा अनेकांना चकित करणारा आहे. इस्रायल अणि गाझामधील हमास यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. तर खिरबेट यानुन गाव वेस्ट बँकेच्या बरोबर मध्यस्थानी आहे.
परंतु सोशल मीडियावर अनेक लोकांनी संबंधि वृद्धाचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. गायीच्या गळ्यात असलेले उपकरण ट्रॅकर असू शकते असे त्यांचे सांगणे आहे. एका युजरने थट्टेच्या सुरात ही गाय जणू सर्वच गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी बाहेर पडली असावी असे नमूद पेले आहे. तर अन्य एका युजरने इस्रायल डेअरी फोर्सेसची कुख्यात हेरगिरी युनिट अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.