सारवलेले अंगण.. ठिपक्याची रांगोळी आणि निवांतपणा
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
गेल्या वर्षी सहा जानेवारीला या गोठणे। ग्राम पर्यटनाची ग्रामस्थांनी घोषणा केली. साधारण जानेवारीत म्हणजे नव्या वर्षात केलेल्या घोषणा कशाबशा महिन्याभर टिकतात. पण गोठणे वसाहत ग्रामस्थांनी ही घोषणा मनापासून जपत कोल्हापूरच्या पर्यटन नकाशावर गोठणे हे नाव गडद केले.
चांदोली व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करताना त्या परिसरातील काही गावे विस्थापित झाली, त्यात गोठणे हे एक गाव होते. गोठणे गावाच्या तिन्ही बाजूला जंगल, खळाळत्या झऱ्याचे पाणी, स्वच्छ हवा, सेंद्रिय शेती त्यामुळे एका वेगळ्याच समाधानात असलेल्या गावकऱ्यांना मनावर दगड ठेवून गाव सोडून सोडावे लागले. त्यामुळे काहीजण वडगाव, काहीजण दानोळी, काहीजण शिरोळ येथे गेले आणि पंधरा जण मात्र शाहूवाडी तालुक्यात वारूळ गावात गेले. तेथे त्यांनी गोठणे वसाहत उभी करायला सुरुवात केली.
ही वसाहत उभी करताना सिमेंट काँक्रीटचे जंगल त्यांनी उभे केले नाही. दगड, कौले, लाकडी वासे, बांबू याचाच वापर त्यांनी आवर्जून केला. त्यामुळे कौलारू घरांची एक वसाहतच तेथे उभी राहिली. प्रत्येक घरासमोर अंगण, परसबाग ठेवली. अंगणात तुळशी वृंदावन फुलले. घराचे अंगण प्रत्येक शनिवारी शेणाने सारवले जाऊ लागले. काही घरातील जमीनही मातीचीच ठेवण्यात आली. सर्वांनी ठरवून चाफा, पारिजातक, जास्वंदीची रोपटी फुलवली. अंगणात कट्टे तयार केले. दिवसभर दमून भागून घरी आले आणि कट्ट्यावर बसून थंडगार पाण्याचे चार घोट घेतले की दिवसभराचे सारे श्रम विसरले जाऊ लागले.
ही घरे एक दिवस 'स्वयंसिद्धा'च्या कांचन परुळेकरताईनी पाहिली व अशा घरात पर्यटकांची राहण्याची सोय आणि संबंधित ग्रामस्थांना आर्थिक मिळकतीचा आधार अशा अर्थाने विचार करण्यास ' सुरुवात केली. ग्रामस्थांना हा विचार पटवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थ एका क्षणात नाही, पण हळूहळू तयार होऊ लागले.
आमच्या अशा साध्या घरात अंगणात बाहेरची माणसं कशी येतील? हाच प्रश्न त्यांच्या मनात रुखरुखुत राहिला. पण परुळेकर, श्रीकृष्णराव माळी, डॉ. रेश्मा पंवार, प्रवीण पवन सावळेकर, धोंडीबा पवार यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले व गेल्या वर्षी सहा जानेवारीला ग्राम पर्यटनाची घोषणा केली. हळूहळू पर्यटक येऊ लागले आणि आश्चर्य असे की, आल्या आल्या सारवलेल्या अंगणात अक्षरश: पाय पसरून आरामात बसू लागले, असं सावली, सारवलेल्या अंगणात कधी निवांत गेल्या वीस-पंचवीस वर्षात बसायलाच मिळालं नाही, असे कौतुकानेच म्हणू लागले.
इथल्या जेवणाच्या ताटात भाकरी, भाजी, पालेभाजी, नाचणीची भजी, कढी, आंबील, सांडगे, कुरवड्या, लोणचे, दही, ताक असे वेगवेगळे पदार्थ पाहून डिशची ऑर्डरच विसरले. जेवणाला डायनिंग टेबल नाही. घोंगड्यावर मांडी घालून बसून ताव मारू लागले आणि ए.सी. ऐवजी खुली गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत दुपारची झोप काढू लागले. त्यानंतर शेतीच्या प्रतिमा प्रतिकात्मक कामाचाही आनंद घेऊ लागले. बैलगाडीतून गावाभोवती फेरफटका मारू लागले. हाताला माती लागली तर शी.. ई.. म्हणणारी पोरं मातीत लोळण्याचा आनंद घेऊ लागली. आज वर्ष झाले हे पर्यटन सुरू आहे. यावर्षीपासून रात्री मुक्काम, चांदणे दर्शन, पौर्णिमेला चंद्रदर्शन, पावसाळ्यात भात रोपण असे वेगवेगळे नवे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या क्षणी तरी पर्यटकांना छोट्या छोट्या खेड्याकडे ओढून घेण्यात आणि ग्राम पर्यटनाचा आनंद देण्यात गोठणेवासीय यशस्वी झाले आहेत.
पर्यावरण अधिकाधिक समृद्ध होऊ लागले आहे. पण आरोग्य आणि मानसिक शांततेकडेही लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे ते अशा नैसर्गिक पर्यटनाकडे ओढले जात आहेत. गोठणे हे एक असेच आरोग्यदायी व शांतीपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे. जरूर तुम्ही एकदा गोठणे वसाहतीला भेट द्या.
श्रीकृष्णराव माळी, व्यवस्थापन