एका देशाचे अस्तित्वच संपून जाणार
तुवालु एक छोटा बेट देश असून तो प्रशांत महासागरात आहे. हा देश हवामान बदलाच्या माऱ्याला झेलत आहे. याची पूर्ण लोकसंख्या बुडण्याच्या धोक्याला सामोरी जात आहे. आता जगातील पहिले सुनियोजित राष्ट्रीय पलायन सुरू झाले आहे. 16 जूनपासून सुरू झालेल्या व्हिसा अर्जात 5,157 लोकांनी (जवळपास निम्मी लोकसंख्या) ऑस्ट्रेलियात शरणासाठी नोंदणी केली आहे.
18 जुलै रोजी अर्जप्रक्रिया बंद झाली आहे. दरवर्षी 280 तुवालु लोक ऑस्ट्रेलियात जाऊ शकतील. हे सर्व हवामान बदलाच्या भयानक प्रभावामुळे घडत आहे. तुवालु हे ऑस्ट्रेलिया आणि हवाईदरम्यान आहे. 9 सखल एटॉलने हा देश तयार झाला असून याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून केवळ 6 फूट आहे. सर्वात उंच ठिकाण देखील 15 फूट आहे.
मागील 30 वर्षांमध्ये समुद्राची पातळी 6 इंचाने वाढली आहे. 2050 पर्यंत तुवालुचा निम्मा हिस्सा पाण्यात बुडालेला असेल. तर 2100 पर्यंत 90 टक्क्यांहून अधिक भूमी गायब झालेली असेल, असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
याचबरोबर वादळ, पूर आणि भरतीच्या लाटा तुवालुचे नुकसान घडवून आणत आहेत. समुद्राचे खारे पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये शिरत असल्याने पेयजल आणि पिकांची हानी होत आहे. लोक स्वत:च्या पिकांना जमिनीवर उचलण्यास हतबल आहेत, परंतु हे दीर्घकाळ उपयुक्त ठरणार नाही. नासानुसार 2050 पर्यंत फुनाफुती (राजधानी)चा निम्मा हिस्सा दररोज पाण्यात बुडालेला असेल, तेथेच देशाची 60 टक्के लोकसंख्या राहते.
ऑस्ट्रेलियासोबत करार
या भयानक स्थितीला सामोरे जाण्यासाठी 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि तुवालुने युनियन करारावर स्वाक्षरी केली. हवामान बदलाने प्रभावित पूर्ण देशाच्या पलायनाची योजना तयार करणारा हा जगातील पहिला करार आहे. या कराराच्या अंतर्गत दरवर्षी तुवालुचे 280 लोक ऑस्ट्रेलियात जाऊ शकतील. व्हिसासाठी 16 जून ते 18 जुलैपर्यंत नोंदणी झाली. पहिल्या चार दिवसांमध्येच 3125 लोकांनी नेंदणी केली. आतापर्यंत 5157 लोकांनी स्वत:चे भाग्य आजमाविले आहे. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या (11 हजार) सुमारे निम्मे आहे.
या व्हिसाद्वारे तुवालुचे लोक ऑस्ट्रेलियात राहण्यासह काम करु शकतात, शिक्षण घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियन लोकांप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण सुविधा मिळवू शकतात. तसेच मर्जीनुसार तुवालु येथे परत जाऊ शकतात. परंतु बुडत चाललेल्या देशात परतण्याची अपेक्षा कमी होत चालली आहे. हा गर्वासोबत पलायनाचा मार्ग आहे, कारण हवामान बदल या लोकांचे जीवन, सुरक्षा आणि भविष्याला उदध्वस्त करत असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारचे सांगणे आहे. हवामान बदलामुळे लोक स्वत:च्या घरांना गमावत आहेत, भोजनपाण्याचे संकट तीव्र होत चालले आहे. 80 वर्षांमध्ये तुवालु पूर्णपणे राहण्यायोग्य राहणार नसल्याची भीती वैज्ञानिकांना आहे.