अविरत झुंज वादळाशी...
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातून नुकत्याच निर्माण झालेल्या ‘दाना’ चक्रीवादळावर ओडिशाने यशस्वीपणे मात केली आहे. अशाप्रकारची चक्रीवादळे येतात तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम किनारपट्टीच्या राज्यांवर होतो. ओडिशाला दरवषी वादळांचा सामना करावा लागतो. या ठिकाणी कोणत्याही वादळाचा सर्वाधिक परिणाम होतो. गेल्या 100 वर्षांत येथे 260 हून अधिक मोठी वादळे आली आहेत. मात्र, येथील सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे अलिकडच्या काही वर्षात जीवित आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे कमीत कमी नुकसान करण्यात ओडिशा यशस्वी होताना दिसते. ओडिशाला दरवर्षी चक्रीवादळांचा सामना करावा लागत असल्यामुळे तेथील सरकार परिणामकारक उपाययोजना हाती घेते. 2014 मध्ये राज्याला धडकलेल्या ‘हुदहुद’ वादळात केवळ दोघांचा मृत्यू झाला. तर 2019 मध्ये ‘फैनी’ चक्रीवादळाचा तडाखा बसला, तेव्हा सरकारने वादळापूर्वीच बाधित भागातून तब्बल 12 लाखांहून अधिक लोकांना बाहेर काढत सर्वात मोठी सतर्कता मोहीम राबविली होती.
चक्रीवादळ विशिष्ट परिस्थितीत तयार होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी उबदार होते, तेव्हा समुद्रात वादळ येते. पाणी गरम होऊन उडते आणि वरच्या थंड हवेशी आदळते. उष्ण वारे वर पोहोचल्यामुळे खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. याचदरम्यान सभोवतालच्या वाऱ्यांमुळे कमी दाबाच्या क्षेत्रातील दाब वाढतो. त्यामुळे चक्रीवादळ होण्याची परिस्थिती निर्माण होते. चक्रीवादळ काही दिवस किंवा काही आठवडे टिकू शकते.
चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होते. जीवितहानी होते आणि पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान होते. अनेक झाडे आणि दळणवळण यंत्रणा कोलमडून पडते. चक्रीवादळांमुळे समुद्राच्या पातळीतही असामान्य वाढ होते. परिणामी समुद्राच्या पाण्यामुळे किनारी प्रदेशातील सखल भागात पाणी येते. समुद्रकिनाऱ्यांची धूप होत तटबंदी नष्ट होते. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर व्यापक संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका मोठा असतो. ओडिशात 1999 मधील चक्रीवादळाच्या प्रभावानंतर अतिसार आणि कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती.
ओडिशाची भौगोलिक स्थिती वादळांसाठी चुंबकाप्रमाणे काम करते. बंगालच्या उपसागरात जेव्हा वादळ निर्माण होते, तेव्हा ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकते. भारताची किनारपट्टी वक्रस्थितीत असलेल्या ठिकाणी ओडिशा राज्य वसलेले असल्यामुळे त्याच्या किनाऱ्यावर वादळांचा सर्वाधिक परिणाम होतो. भारताच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ हे अरबी समुद्रातील वादळापेक्षा बरेच वेगळे असते.
बहुतेक वादळे बंगालच्या उपसागरातच निर्माण होतात. कारण बंगालचा उपसागर अरबी समुद्रापेक्षा जास्त उबदार आहे. त्यामुळेच ओडिशात दरवषी वादळे येतात. बंगालच्या उपसागरात वर्षभरात दोन टप्प्यात चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्मयता असते. ही वादळे शक्यतो मार्च ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान धडकतात.
वादळामुळे एकही मृत्यू न होण्याचे लक्ष्य आम्ही साध्य केले. ‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा लाख लोकांना सरकारने सुरक्षितस्थळी हलवले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून माझ्यासह वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
- मोहन मांझी, मुख्यमंत्री, ओडिशा
‘सुपर सायक्लोन’मधून ‘झिरो पॅज्युअल्टी’चे लक्ष्य
ओडिशामध्ये 1999 मध्ये आलेल्या वादळाला ‘सुपर सायक्लोन’ (महातुफान) असे संबोधले जाते. या वादळात 9,885 लोकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी अहवाल दर्शवतात. तसेच साडेचार लाख जनावरेही मरण पावली. एवढेच नव्हे, तर 17 हजारांहून अधिक शाळा आणि 12 हजार किलोमीटरचे रस्तेही उद्ध्वस्त झाले. या वादळातून धडा घेत ओडिशा सरकारने ‘झिरो पॅज्युअल्टी’चे लक्ष्य निश्चित केले. सर्वप्रथम सरकारने ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ओडिशा स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी - ओएसडीएमए) स्थापन केले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले हे देशातील पहिले राज्य होते. तर केंद्रीय स्तरावर 2005 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (एनडीएमए) स्थापना करण्यात आली. ओडिशा सरकारने केवळ नैसर्गिक आपत्तींबद्दल लोकांना जागरुक केले नाही, तर त्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणही दिले.
संयुक्त राष्ट्राकडून गौरव
ओडिशा सरकारच्या अनेक वर्षांची मेहनत आणि तयारीमुळे वादळामुळे झालेल्या मृत्यूची संख्या दुहेरी आकड्यापर्यंत सीमित रहिली. 2013 मध्ये ओडिशात ‘फैलिन’ नावाचे वादळ आले होते. हे वादळही 1999 सारखेच होते. हे वादळ आले तेव्हा ओडिशात ताशी 250 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत होते. पण सरकार असल्यामुळे आधीच प्रभावित भागातून 11 लाख लोकांना बाहेर काढले होते. परिणाम असा झाला की, त्या वादळात केवळ 44 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 23 जणांचा मृत्यू वादळानंतर आलेल्या पुरामुळे झाला. यासाठी ओडिशा सरकारचा संयुक्त राष्ट्रानेही गौरव केला होता.
सतर्कतेसाठीच्या उपाययोजना
ओडिशा सरकारने संपूर्ण किनारपट्टीवर रस्त्याचे जाळे तयार केले आहे. हे रस्ते अत्यंत मजबूत असल्यामुळे लाटांशी यशस्वीपणे प्रतिकार करतात. त्याचा उपयोग बाधित भागातून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केला जातो. सरकारने 800 हून अधिक निवारागृहेही बांधली आहेत. चक्रीवादळापूर्वी किनारपट्टी भागातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांची सोय या निवारागृहांमध्ये केली जाते.
समुद्राचे पाणी किनारपट्टीच्या गावांमध्ये जाऊ नये, यासाठी बंधारे बांधण्यात आले. आजुबाजूच्या गावांमधील लोकांसाठी पक्की घरे तयार करण्यात आली आहेत. ही घरे वादळ आणि पावसाचा यशस्वीपणे सामना करू शकतात.
किनारपट्टी भागातील 1200 गावांमध्ये चक्रीवादळाचा इशारा देणारी यंत्रणाही बसवली आहे. या यंत्रणेद्वारे पूर, वादळ किंवा आपत्तीवेळी सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा दिला जातो. किनारी भागात 120 हून अधिक मॉनिटरिंग टॉवर बसविण्यात आले आहेत. टॉवरच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींवर नजर ठेवली जाते.
1999 च्या चक्रीवादळापासून धडा घेत सरकारने तळागाळात जाऊन लोकांना प्रशिक्षित केले आहे. खेडोपाड्यातील महिलांनाही वादळ आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत याचा फार मोठा फायदा होता.
आताही वर्षातून दोनवेळा जून आणि नोव्हेंबरमध्ये मॉकड्रील घेण्यात येतात. पण केवळ लोकांना प्रशिक्षण देऊन वादळाचा सामना करता येत नाही. त्यासाठी पायाभूत सुविधाही सरकारने तयार केल्याने जीवितहानी कमी होते.
इस्रोच्या उपग्रहांचा चमत्कार, चक्रीवादळापूर्वी मिळते माहितीबदलत्या युगानुसार आता तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. अमेरिका-ब्रिटनप्रमाणे आता भारतानेही अवकाश आणि अंतराळ क्षेत्रात मोठीप्रगती केली आहे. भारताने अवकाशात पाठविलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून
चक्रीवादळे, पाऊस, हवामान याची अचूक माहिती इस्रोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांचा मागोवा घेण्यातही भारतीय उपग्रह यशस्वी ठरले आहेत. ईओएस-06 उपग्रहाच्या माध्यमातून
चक्रीवादळांची पूर्वकल्पना हवामान विभागाला मिळते. 2022 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला ईओएस-06 हा उपग्रह ध्रुवीय कक्षेत फिरत आहे. तसेच भूस्थिर कक्षेतील इन्सॅट-3 डीआर अंतराळयान चक्रीवादळावर सतत लक्ष ठेवत असते.
ईओएस-06 हा उपग्रह दोन वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 2022 रोजी पीएसएलव्ही-सी 54 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला होता. हा एक ध्रुवीय उपग्रह आहे. त्यामध्ये स्कॅटरोमीटर हे सेन्सर उपकरण स्थापित करण्यात आले आहे. त्यातून समुद्रावरून वाहणारे समुद्री वारे आणि त्यांचे अभिसरण याची माहिती मिळते. ही माहिती वेळोवेळी इस्रोच्या माध्यमातून हवामान विभागासह अन्य संबंधित यंत्रणांना पुरविली जाते. सदर उपग्रह चक्रीवादळांच्या निर्मितीचा अंदाज बांधून त्यांच्या वेगाचा मागोवा घेत भारतातील त्यांचा प्रभाव कमी करण्यात मदत करतात. यादरम्यान उपग्रह-आधारित निरीक्षणांचा वापर करून त्यांच्या वाऱ्यांची तीव्रता मोजून चक्रीवादळांचे उत्तम निरीक्षण केले जाते. यासंबंधी इत्यंभूत माहिती चक्रीवादळाच्या अंदाजासाठी जबाबदार असलेल्या भारतीय हवामान विभागाकडे हस्तांतरित करण्यात येते.
स्वतंत्र मॉडेलही विकसित
स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने (एसएसी) ढगफुटीचा इशारा तसेच अतिवृष्टीसाठी एक स्वतंत्र मॉडेल विकसित केले आहे. हे पूर्वानुमानकर्त्यांसाठी तसेच संशोधकांसाठी उपलब्ध आहे. इस्रोच्या नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरने आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सहकार्याने फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टीम (एफएलईडब्ल्यूएस) विकसित केली आहे. केंद्रीय जल आयोगाकडूनही त्याचा वापर केला जात आहे.
चक्रीवादळांचे नामकरण
वादळांना नाव देण्याची व्यवस्थाही अस्तित्वात आहे. 2000 सालापासून जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया आणि पॅसिफिक अंतर्गत नामकरण पद्धत सुरू झाली. या गटात बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, पाकिस्तान आणि थायलंड यांचा समावेश आहे. तथापि, 2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या अन्य पाच देशांचाही त्यात समावेश करण्यात आला. हे देश वादळांना स्वत:ची नावे देतात. जागतिक हवामान संघटनेने विविध देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे. त्यामुळेच वादळ येण्यापूर्वीच त्याचे नाव काय असेल हे ठरविले जाते. ही यादी दर सहा वर्षांनी बदलली जाते. भारताच्या किनारपट्टीला नुकतेच धडकलेले ‘दाना’ चक्रीवादळाचे नाव कतारने दिलेले आहे. ‘दाना’ हा शब्द अरबी भाषेतून घेतलेला आहे. याचा अर्थ ‘उदारता’ असा होतो.
ओडिशाला दरवर्षी करावा लागतो वादळांचा सामना
झंझावाती चक्रीवादळे सक्षमपणे पेलण्याची क्षमता
25 वर्षांपूर्वी आलेल्या ‘महातुफाना’तून घेतला धडा
- संकलन - जयनारायण गवस