महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आत्मविश्वास दुणावणारा पराभव

06:25 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कष्टाने हातात आलेला घास, तोंडात जाता जाता सांडावा, अशा प्रकारचा, शब्दांमध्ये वर्णन न करता येण्यासारखा अनुभव रविवारी संपलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिला आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्याच्या आधीच्या प्रत्येक सामन्यात भारताची कामगिरी अत्युत्कृष्ट झाली. भारताच्या सामन्यांच्या 11 दिवसांपैकी 10 दिवस भारताचे होते. पण अंतिम 1 दिवस आपला नव्हता. 10 दिवस सारेकाही मनासारखे आणि योग्य घडले. पण अंतिम आणि निर्णायक दिवशी मात्र निराशा पदरी पडली. त्यामुळे विजयाचा परमोच्च आनंद साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली नाही, याचे दु:ख वाटणे स्वाभाविक आहे. शेवटच्या क्षणी झालेला हा पराभव निश्चितपणे साऱ्या भारतीयांच्या हृदयाला चरे पाडणारा होता, हे खरे असले तरी भारताची एकंदर कामगिरी उत्तुंग होती, हे नि:संशय आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व आणि नियोजन या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय संघ अन्य कोणत्याही संघापेक्षा, अंतिम सामन्याचा अपवाद वगळता, सरसच ठरला आहे. पराभवाच्या काळ्या ढगाला लाभलेली ही सुवर्णप्रभावळ नाकारता येणार नाही. भारताच्या या स्पृहणीय कामगिरीची झलक खरेतर या विश्वचषक स्पर्धेच्या आधी काही दिवस श्रीलंकेत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पहावयास मिळाली होती. ती स्पर्धा भारतीय संघाने सहजगत्या जिंकली. त्या विजयाने या विश्वचषकाच्या अपेक्षांची नांदी म्हटली गेली. या स्पर्धेतही अगदी प्रारंभापासून भारताने आपला ठसा उमटविला होता. ज्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करुन सहाव्यांदा विश्वचषक पटकाविला, त्या विश्वविजेत्या संघाला पराभूत करुनच भारताने या विश्वचषक स्पर्धेचा श्रीगणेशा केला, हा बोचरा योगायोग म्हणावा लागेल. ही प्रदीर्घ काळ चाललेली स्पर्धा होती. तिच्यात समाविष्ट प्रत्येक संघाला प्रत्येक अन्य संघाशी एक सामना खेळायचा होता. त्यानंतर गुण आणि धावगतीच्या आधारे वरचढ असणाऱ्या चार संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरी आणि शेवटी दोन अव्वल संघांमध्ये अंतिम सामना असे या स्पर्धेचे  एकंदर 48 सामन्यांचे लांबलचक स्वरुप होते. भारताने आपल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचा लीलया पराभव करत सर्वाधिक 18 गुण आणि 2.38 ची सर्वाधिक धावगती यांच्यासह प्रथम फेरीत सर्वोच्च स्थान मिळविले होते. त्यामुळेच उपांत्य आणि अंतिम सामन्यांसंबंधीच्या अपेक्षाही सर्वोच्च पातळीवर पोहचल्या होत्या. भारतीय संघच जिंकणार, हा विश्वास केवळ भारतप्रेमींच्या अंत:करणातच नव्हे, तर भारताला पाण्यात पाहणाऱ्यांच्याही मनात, या अजोड आणि अभेद्य कामगिरीमुळेच निर्माण झाला होता.

Advertisement

ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका हे चार कधीना कधी विश्वविजेते झालेले संघ, तसेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे आतापर्यंत विश्वचषक न प्राप्त केलेले, परंतु तो जिंकण्याची क्षमता असणारे संघ अशा सहा संघांना प्राथमिक सामन्यांमध्ये भारताकडून हार खावी लागली होती. विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले जाण्याचा क्षण अवघे दोन सामने दूर होता. त्यापैकी उपांत्य फेरीचा एक सामनाही पार झाला, पण अंतिम धक्का मात्र, देता आला नाही. शिखर प्राप्त होता होता, गिर्यारोहकाचा पाय घसरावा, तशी विचित्र स्थिती झाली. असे झालेच कसे, यात कोणाचे काय चुकले, कोणी काय करावयास हवे होते, काय नको करावयास हवे होते, याची चर्चा पुढे काही काळ होत राहणार आहे. तथापि, भारतीय संघाची गुणवत्ता, त्याने केलेले परिश्रम, संघभावना, डावपेच आणि एकंदरीतच सर्व खेळाडूंची व्यक्तीगत प्रतिभा यांच्यासंबंधात नाव ठेवण्यासारखे काही नव्हते, हे टीकाकारांनाही मान्य करावे लागणार आहे. संपूर्णत: भारतात आयोजित करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती. तसेच आतापर्यंतच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्याच्या आधी भारताने सर्व प्रतिस्पर्धी देशांना पराभूत करण्यासारखी मोठी कामगिरीही केली नव्हती. सारे काही जुळून आले आहे, असे वाटत असतानाच अंतिम क्षणी मिळालेला हा अनपेक्षित आणि अनाकलकीय धक्का क्रिकेटप्रेमींच्या बराच काळ लक्षात राहणार आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंच्याही तो असाच स्मरणात राहील, हे निश्चित. या स्पर्धेत भारताच्या संघाने जमविलेल्या एकंदर धावा, अन्य कोणत्याही संघापेक्षा जास्त आहेत. भारताने मिळविलेले बळीही सर्वाधिक आहेत. सर्वाधिक सामनेही भारतानेच जिंकलेले आहेत. भारताच्याच फलंदाजाने अर्थात, विराट कोहलीने अन्य कोणत्याही संघाच्या फलंदाजापेक्षा जास्त धावा या स्पर्धेत केलेल्या आहेत, भारताचाच गोलंदाज शमी याने या स्पर्धेतील सर्वाधिक बळीही मिळविले आहेत. पण, विश्वचषक मात्र, भारताचा होऊ शकलेला नाही. हा अभूतपूर्व दैवदुर्विलास तसा सहज विसरता येण्यासारखा नाहीच. पण यालाच ‘जीवन’ असे म्हणतात, असे अनेक मान्यवरांनी सांगून ठेवले आहे. ही स्थिती पचवूनच आता भारतीय संघाने आपले पुढचे मार्गक्रमण अशाच जोमदारपणे करावयाचे आहे. ही शेवटची विश्वचषक स्पर्धा नाही. अशा अनेक, पुढे होणार आहेत. त्या जिंकण्याची स्फूर्ती या पराभवातून भारतीय संघ घेईल. भारतीय क्रिकेटप्रेमीही तितक्याच आपुलकीने आपल्या संघाला पुढेही समर्थन देत राहतील. यावेळी जरी अंतिम क्षणी माघार घ्यावी लागली असली, तरी या अपयशातूनच भविष्यकालीन देदिप्यमान विजयांचा मार्ग सुकर होईल, हा विश्वास सर्वांनीच जपावयास हवा. जे झाले, ते झाले. पण या स्पर्धेने भारतीय संघाला दिलेला आत्मविश्वास त्याला पुढच्या प्रवासात शिदोरीसारखा उपयोगास येईल, हे निश्चित. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे मन:पूर्वक अभिनंदन! भारतालाही त्याच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा!!

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article