किटकांना श्रद्धांजली वाहणारी कंपनी
किटकांच्या सन्मानार्थ मोठे आयोजन
कुठल्याही उदात्त कार्यादरम्यान प्राण गमवावे लागल्यास त्याला हुतात्मा मानून सन्मान दिला जातो. परंतु कधी कुठल्याही किटकांना मृत्यूनंतर कुणी श्रद्धांजली वाहतो का? प्रत्यक्षात एक खास कंपनी दरवर्षी अशाप्रकारचे कृत्य करते. अर्थ कॉर्पोरेशन जपानमध्ये आघाडीची हाउसहोल्ड इंसेक्टिसाइड कंपनी आहे. दशकांच्या संशोधनानंतर या कंपनीने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. स्वत:च्या उत्पादनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी कंपनी अको शहरात एका संशोधन केंद्रात किटकांच्या विविध प्रजातींचा वापर करते आणि या संशोधनात अनेक किटक मृत्युमुखी पडतात. अशा स्थितीत किटकांच्या मृत्यूला आपण कमी लेखत नसल्याचे दाखवून देत अर्थ कॉर्पोरेशन अको शहरात मायोडोजी मंदिरात त्यांच्यासाठी एक सन्मान सोहळा आयोजित करते.
अर्थ कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी अलिकडेच या सोहळ्यात भाग घेतला आहे. यात एक दाओशी (ताओवादी पुजारी) मृत किड्यांच्या अनेक छायाचित्रांसमोर प्रार्थना वाचत होता. यात मंदिराच्या परिसरात किलनी, मच्छर, माशी आणि अन्य किटकांची छायाचित्रे लावली जातात आणि लोक त्यांच्यासाठी प्रार्थनेत उभे असतात. अनेक लोक विज्ञानाच्या नावावर हजारो किटकांच्या बलिदानाचे मूल्य समजून घेत नाहीत, परंतु हा सोहळा हा विचार करण्यास मदत करतो असे अर्थ फार्मास्युटिकल रिसर्चचे प्रमुख टोमिहिरो कोबोरी यांनी म्हटले आहे. अर्थ कॉर्पोरेशनच्या रिसर्च फॅसिलिटी स्वत:च्या वापराकरता सुमारे 10 लाख झुरळं आणि 10 कोटीहून अधिक किटकांचे प्रजनन करविते. या किटकांना नंतर मानवी आरोग्य आणि सुविधांसाठी बलिदान केले जाते. याचमुळे ही कंपनी लाखो किटकांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या बलिदानाचा सन्मान करते. अर्थ कॉर्पोरेशन 4 दशकांपासून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करत आहे.