110 देशांमधील साबणांचा संग्राहक
अजब छंद : हजारो प्रकारचे साबण उपलब्ध
छंदापोटी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करत असतात. अनेक लोकांना नाणी तसेच नोटांचा संग्रह करणे आवडते. तर अनेक जण प्राचीन गोष्टींचा संग्रह करत असतात. परंतु एका इसमाकडे साबणांचा संग्रह आहे. मुजफ्फरनगर येथील या इसमाने कठोर मेहनत करत साबणांचा मोठा खजिना तयार केला असून यात सुमारे 110 देशांमधील साबण उपलब्ध आहेत.
या साबणाच्या खजिन्याचे वैशिष्ट्या म्हणजे यात एक पैशापासून 8500 रुपयांपर्यंतच्या किमतीचे साबण आहेत. या अनोख्या संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे हजारो साबण आहेत. या खजिन्यात देशविदेशातील मूल्यवान साबणांचा भांडार आहे.
सुमारे 45 वर्षांपूर्वी साबण जमविण्याची आवड निर्माण झाली होती. त्यावेळी जय नावाचा साबण मिळायचा. दुकानातून मी दोन साबण खरेदी करायचो, यातील एक साबण स्नानासाठी वापरायचो. तर दुसरा सांभाळून ठेवत होतो. आता माझ्याकडे देशविदेशातील अनेक प्रकारच्या साबणांचा भांडार आहे. या संग्रहाला लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये स्थान मिळाल्याचे जयकुमार यांनी सांगितले आहे.
विदेशातून साबणाची खरेदी
जेव्हा मी कधी कुठल्याही देशात जातो, तेव्हा तेथे हिंडण्यासोबत एक साबण देखील खरेदी करून आणतो आणि तो माझ्या साबणांच्या संग्रहालयात ठेवतो. सध्या माझ्या संग्रहालयात 110 देशांमधील साबण सामील आहेत असे जय कुमार यांनी सांगितले.
पेशाने व्यावसायिक
जयकुमार हे साबणाच्या खजान्यासोबत स्वत:चा व्यापारही वाढवत आहेत. जयकुमार यांचे मुजफ्फरनगर येथे टीव्ही, रेफ्रिजरेटरचे शोरुम आहे. यातूनच त्यांचा विदेश प्रवास होत असतो. या विदेशप्रवासावेळी जयकुमार हे साबण खरेदी करत असतात. त्यांच्या संग्रहालयात खेळणी, दागिने, मेणबत्ती इत्यादी प्रकारच्या कलाकृतींच्या आकारातील साबण देखील आहेत.