जिह्यात चुरशीने 76.25 टक्के मतदान
कोल्हापूर :
जिह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्यामुळे बुधवारी मोठ्या चुरशीने 76.25 टक्के मतदान झाले. दहा विधानसभा मतदारसंघातील 121 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. प्रशासनाने मतदारांना घरपोच व्होटर स्लीप दिल्यामुळे तसेच निवडणुकीपूर्वी मतदान नोंदणी उपक्रम राबवल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम निवडणूक प्रक्रियेवर दिसून आले. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातही मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ झाली. काही अपवादात्मक प्रकार वगळता निवडणूक शांततेत पार पडली. शनिवारी (23 रोजी) सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार असून दुपारपर्यंत निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. यामध्ये विशेषत: तरूणांसह, नवमतदार, महिला व वयोवृध्दांची संख्याही लक्षणीय होती. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 74.61 टक्के मतदान झाले. तर राधानगरीमध्ये 78.26 , कागल 81,72 कोल्हापूर दक्षिण 74.95 करवीर 84.79 कोल्हापूर उत्तर 65.61 शाहूवाडी 79.04 हातकणंगले 75.50 इचलकरंजी 68.95 शिरोळ 77.06 टक्के इतके मतदान झाले. मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारसंघातील मतदान यंत्रामध्ये किरकोळ बिघाड झाल्याने ती यंत्रे बदलून त्या ठिकाणी पर्यायी मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली.
गेल्या महिनाभरापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. त्याची सांगता बुधवारी मतदानातून झाली. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार बाहेर काढण्याची यंत्रणा सर्वच उमेदवारांनी सज्ज ठेवली होती. उमेदवारांनी अस्त्वाची तर नेत्यांकडून प्रतिष्ठेची बनवलेल्या या निवडणुकीत साम, दाम, दंड या चाणक्य नीतीचा सर्रास वापर केला गेला.
मतदार याद्यांमध्ये घोळ, अनेक मतदार मतदानापासून वंचित
मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्यामुळे जिह्यामध्ये शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत. काही नवमतदारांनी मतदानासाठी नाव नोंदणी करूनही त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ठ झाली नव्हती. तसेच काही जुन्या मतदारांची नावांचा समावेश याद्यामध्ये नव्हता. याबाबत त्यांनी संबंधित मतदान केंद्राध्यक्षांच्याकडे तक्रार केली. पण त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचितच राहिले.
कोल्हापूर दक्षिण, उत्तरच्या निकालाकडे लक्ष
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील व भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात हायव्होल्टेज लढत झाली. तर कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये झालेली दिरंगाई आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असला तरी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यात लाटकर यांच्या प्रचाराला गती मिळाली. तर राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून गेल्या दोन वर्षांपासूनच मतदारसंघात संपर्क कायम ठेवून विकासकामांसाठी निधी खेचून आणला आहे. त्यामुळे क्षीरसागर आणि लाटकर या दोघांकडूनही विजयी होण्याचा दावा प्रतिदावा केला जात असला तरी मतदारांनी काय कौल दिला आहे हे मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे.
करवीरमध्ये कोण मारणार बाजी ?
करवीर मतदारसंघात काँग्रेसचे राहूल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके व जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यामध्ये चुरशीची प्रमुख तिरंगी लढत झाली. पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राहूल पाटील यांना मिळालेली सहानुभूती, लाडकी बहीण योजनेसह महायुतीने राबविलेल्या अन्य योजनांचा लाभ मिळणार असल्याचा नरके यांचा दावा आणि करवीर मतदारसंघात जनसामान्यांसाठी केलेली कामे आणि विकासकामांसाठी उपलब्ध केलेला निधी आदी कारणांमुळे जनता आपल्यासोबतच आहे असा दावा या तिन्ही उमेदवारांकडून केला जात आहे.
शाहूवाडीत तगडी कुस्ती
शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्यचे उमेदवार आमदार विनय कोरे आणि शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यामध्ये काटाजोड लढत झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या काठावरच्या पराभवामुळे सत्यजीत पाटील यांना जनतेची सहानुभूती मिळेल अशी चर्चा होती. तर गेल्या पाच वर्षांतील विकासकामांच्या जोरावर जनता आपल्याच पाठीशी असल्याचा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला आहे.
राधानगरीत जनता कोणाच्या पाठीशी ?
राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर व शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार माजी आमदार के.पी.पाटील यांच्यात प्रमुख दुरंगी सामना झाला. या दोन्ही उमेदवारांकडून मतदानानंतर विजयाचा दावा केला जात असला तरी राधानगरीची जनता कोणच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली आहे, हे निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदाताई बाभूळकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंगराव खोराटे, अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये जनमताचा कौल कोणाला मिळेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
कागलमध्ये विजयाचा दावा प्रतिदावा
कागल मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे समरजीत घाटगे यांनी बुधवारी मतदानानंतर विजयाचा दावा प्रतिदावा केला आहे. पण कागलची जनता कोणाला पाठबळ देणार ? हे मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे.
इचलकरंजीत दिग्गजांची प्रतिष्ठा प्रणाला
इचलकरंजी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहूल आवाडे व शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यात अटीतटीची लढत झाली. शिरोळमध्ये महायुतीचे पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि स्वाभिमानीचे उल्हास पाटील यांच्यामध्ये प्रमुख तिरंगी लढत झाली. तर हातकणंगलेत काँग्रेंसचे उमेदवार राजू आवळे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने, आणि स्वाभिमानीचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या चुरशीचा तिरंगी सामना झाला. या तिन्ही मतदारसंघात कोण विजयी गुलाल लावणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.