लखनौ व गुजरातमध्ये आज तुल्यबळ लढत
वृत्तसंस्था/ लखनौ
गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेला गुजरात टायटन्स आणि यजमान लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज शनिवारी होणारा आयपीएल सामना ही दोन तुल्यबळ संघांमधील लढत असून यावेळी फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनला मोहम्मद सिराजचे आव्हान पेलावे लागेल. ही आकर्षक लढत ठरण्याची शक्यता आहे. टायटन्सने सलग चार सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या तुलनेत चांगल्या नेट रन-रेटच्या आधारे (8 गुण) अव्वल स्थान पटकावले आहे. एलएसजी सध्या सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि कर्णधार रिषभ पंत यांनी पूरनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्याचा निर्णय कामी आलेला आहे. परंतु आज सिराजच्या रुपाने त्याला एका धूर्त गोलंदाजाचा सामना करावा लागेल. पॉवरप्ले षटकांमध्ये सिराजविरुद्ध फटकेबाजी करणे नेहमीच सोपे नसते आणि केवळ पूरनच नाही, तर दोन सलामीवीर एडेन मार्करम आणि मिशेल मार्श यांनाही त्याच्याविरुद्ध खेळताना काळजी घ्यावी लागेल. गेल्या सामन्यात कागिसो रबाडाच्या अनुपस्थितीमुळे टायटन्सचे फारसे नुकसान झाले नाही, कारण प्रसिद्ध कृष्णाने सुधारित कामगिरी केलेली आहे. तर डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोरने (10 बळी) संघाचा आघाडीचा फिरकीपटू रशिद खानला (3 बळी) मागे टाकले आहे. याशिवाय अर्शद खान, कुलवंत खेजरोलिया यांच्यासारखे गोलंदाज त्यांच्याकडे असून रशिद खानला जर लय सापडली, तर टायटन्सला रोखता येणार नाही.
शुभमन गिल आणि रिषभ पंत या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आतापर्यंत प्रभाव पाडता आलेला नसून गिलने 148 धावा केल्या आहेत. त्यामुळे बी. साई सुदर्शन (273 धावा) आणि जोस बटलर (203 धावा) यांना वरच्या फळीत मोठ्या प्रमाणात भार पेलावा लागलेला आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीत करारबद्ध झालेल्या पंतसाठी तर हा हंगाम खूपच खराब गेला असून त्याला चार डावांमध्ये फक्त 19 धावा काढता आल्या आहेत.
संघ-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), बी. साई सुदर्शन, जोस बटलर, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार, करिम जनात.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.