समुद्रात दफन भव्य मंदिरांचे शहर
हजारो वर्षांपूर्वी पाण्यात सामावले
प्राचीन काळात अशी अनेक शहरे होती, जी अत्यंत आकर्षक होती, परंतु काही कारणांमुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. असेच एक शहर प्राचीन काळात इजिप्तमध्ये होते. हे शहर स्वत:ची अविश्वसनीय मंदिरे आणि बंदरांसाठी ओळखले जायचे. भूमध्य समुद्रातील थोनिस-हेराक्लिओन हजारो वर्षांपूर्वी बुडाले होते. नंतर समुद्राखाली याचा शोध लावण्यात आला. थोनिसची प्राचीन सुरुवात ख्रिस्तपूर्व 8 व्या शतकातील आहे. त्यावेळी इजिप्तच्या याला सर्वात महत्त्वपूर्ण व्यापारी बंदर शहराच्या स्वरुपात स्थापन करण्यात आले होते.
उत्तर किनाऱ्यावर परस्परांमध्ये जोडलेल्या बेटांच्या साखळीत फैलावलेल्या या महानगराला ‘नीलचे व्हेनिस’ म्हटले जाते. एकेकाळी हे भूमध्य समुद्रासाठी देशाचे प्रवेशद्वार होते. प्राचीन ग्रीक इतिहासकार आणि दार्शनिकांनी या ठिकाणचा उल्लेख केला आहे. हे शहर एका मध्यवर्ती मंदिराच्या चहुबाजूला वसविण्यात आले होते अनेक बंदरांसोबत कालव्यांनी वेढलेले होते. घाट, पूल आणि पोंटुनोंचे एक नेटवर्क शहरातील सर्व घरांशी जोडलेले होते. या महानगराचे मुख्य आकर्षण शहराच्या मध्यभागी असलेले अमुन-गेरेबचे मोठे मंदिर होते. थोनिस निश्चितपणे एक आश्चर्यकारक आणि स्वत:च्या काळातील सर्वात महान शहरांपैकी एक होते.
थोनिस हे शहर निसर्गाच्या कोपामुळे नष्ट झाले. भूकंप, त्सुनामी आणि वाढती सागरपातळी यामुळे संपुष्टात आले. सुमारे ख्रिस्तपूर्वी 100 साली एका भीषण पूरामुळे हे शहर नष्ट झाले. आठव्या शतकात थोनिसचे शिल्लक भाग समुद्रात बुडाले. शहर पूर्णपणे पाण्यात सामावले गेले. एक हजार वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत शहराची खरी ओळख अज्ञात राहिली. संशोधकांच्या एका पथकाने खोल समुद्रात जात या शहराचा शोध घेतला आहे. थोनिस-हेराक्लिओनला 2000 साली पुरातत्व तज्ञांनी शोधले आहे.
संशोधकांना 15 फूटापेक्षा अधिक उंच मूर्तींसोबत इमारतींचे अविश्वसनीय अवशेष देखील आढळले आहेत. तसेच अनेक कलाकृतींचाही शोध लागला आहे. थोनिसच्या मृत अवशेषांमधून शिरस्त्राण, अत्तराच्या बाटल्या, दागिने आणि नाणी देखील सापडली आहेत.