मुलाचा काबूल-दिल्ली प्रवास
30,000 फूट उंचीपर्यंत विमानाचे उड्डाण, 94 मिनिटांचा प्रवास : तरीही मुलगा सुखरुप
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, काबूल
‘आश्चर्य... चमत्कार... की नवल...’! विमान वाहतूक इतिहासात अशा अनोख्या घटनेबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. एक 13 वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानमधील काबूलहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपून भारतात पोहोचला. दोन दिवसांपूर्वीच ही एक धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, तब्बल 94 मिनिटांच्या प्रवासात विमानाने 30 हजार फूटांपर्यंत झेप घेऊनही तो कसा काय बचावला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रविवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10:20 वाजण्याच्या सुमारास केएएम एअरलाईन्सचे विमान (आरक्यू-4401) दिल्ली विमानतळावर उतरले तेव्हा ही घटना निदर्शनास आली. चौकशी केल्यानंतर त्यांना सदर मुलगा अफगाणिस्तानातील कुंडुझ येथील असून तो लँडिंग गियरमध्ये लपून तिकिटाशिवाय आल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस त्याच दिवशी त्याच विमानातून मुलाला अफगाणिस्तानला परत पाठवण्यात आले. मुलाने काबूल विमानतळावर प्रवेश केल्यानंतर विमानाच्या मागील लँडिंग गियरच्या डब्यात प्रवेश करण्यात तो यशस्वी झाला होता.
94 मिनिटांची जीवन-मरणाची लढाई
अफगाणिस्तानचे केएएम एअरलाइन्सचे विमान रविवार, 21 सप्टेंबर रोजी काबूलच्या हमीद करझाई विमानतळावरून सकाळी 8:46 वाजता निघाले आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर सकाळी 10:20 वाजता उतरले. केएएम एअरचे विमान 94 मिनिटांत काबूलहून दिल्लीला पोहोचले. त्यानंतर एअरलाईन्स कर्मचाऱ्यांना एक मुलगा विमानाजवळ भटकताना दिसल्यानंतर त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना माहिती दिली. सीआयएसएफने मुलाला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. ‘आपण उत्सुकतेपोटी हे काम केले आहे. आपल्याला हा प्रवास कसा वाटतो ते पहायचे होते, असे मुलाने अधिकाऱ्यांना सांगितले.
अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी
तपासादरम्यान एअरलाईन्सच्या सुरक्षा आणि अभियांत्रिकी पथकाला लँडिंग गियरजवळ एक लहान लाल स्पीकर देखील आढळला. या धक्कादायक घटनेनंतर, मुलाला चौकशीसाठी ताबडतोब संबंधित एजन्सींकडे आणण्यात आले. कसून तपासणी केल्यानंतर विमान सुरक्षित घोषित करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला त्याच दिवशी दुपारी केएएम एअरलाईन्सच्या परतीच्या विमानाने (आरक्यू-4402) काबूलला परत पाठवण्यात आले. तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नसल्याचे समजते.
...हा तर मृत्यूशी खेळ!
विमानाच्या चाकाजवळ बसून प्रवास करणे जवळजवळ अशक्य आहे. विमान उ•ाण करताच, ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होते आणि तापमान गोठणबिंदूपेक्षा खूपच खाली जाते. चाकांमध्ये अडकलेली व्यक्ती चाकांनी चिरडून मरू शकते. तसेच टेकऑफ केल्यानंतर जेव्हा चाके मागे हटतात तेव्हा जागा पूर्णपणे बंद होते. आत कोपऱ्यात अडकून प्रवासी काही काळ जगू शकतो, परंतु 30,000 फूट उंचीवर, श्वास घेणे आणि जगणे जवळजवळ अशक्य असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.`