For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकांच्या स्वप्नांपेक्षा पाल्यांचा कल महत्त्वाचा !

01:12 PM May 15, 2025 IST | Radhika Patil
पालकांच्या स्वप्नांपेक्षा पाल्यांचा कल महत्त्वाचा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

दहावी झाली पुढे कोणत्या शाखेत जायचं? बारावीनंतर काय करायचं? असा प्रश्न पडत नाही असे कुटुंब शोधून सापडणार नाही. यामागे पाल्यांचा कल किंवा बुध्यांकापेक्षा पालकांची स्वप्ने दडलेली असतात. दहावी, बारावीनंतर तब्बल 286 शाखा आहेत. पाल्याची बौद्धिक आणि मानसिक क्षमता पाहुन पुढील शिक्षणाचा पर्याय शोधला पाहिजे. कोणतीही शाखा किंवा शिक्षण वाईट किंवा चांगले नसते, यात गरज असते ती तळमळीने, जिद्दीने ते शिक्षण जीवन सर्वार्थाने सुंदर आणि सहज करण्यासाठी उपयोगात आणण्याची. या आणि अशा अनेक मार्गदर्शनपर माहिती तज्ञांनी ‘तरुण भारत संवाद’तर्फे बुधवारी शहर कार्यालयात झालेल्या तज्ञ मान्यवरांच्या राउंड टेबल चर्चेत दिली.

या चर्चा सत्रात कोल्हापूर विभागीय मंडळ सचिव सुभाष चौगुले, शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधीविभाग संचालक डॉ. अजित कोळेकर, शासकीय तंत्रनिकेतन इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय गर्गे, डी. वाय. पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सहभाग नोंदवला. या चर्चासत्रात पाल्याची क्षमता ओळखताना पालक नेमकं काय चूक करतो हे मार्मिक उदाहरण देताना, प्रा. महादेव नरके म्हणाले, एखाद्या चौकातील दिवा हजार व्हॅटचा असतो. घरातील देवघरातील दिवा पाच व्हॅटचा असतो. चौकातील दिवा मोठा उजेड देतो, तो मोठा दिसतो त्याप्रमाणे आपल्या पाल्याने मोठ व्हावे, मोठ दिसाव असा कल साधारण पालकांचा असतो. मात्र देवघरातील दिवा पाच व्हॅट आहे, कमी उजेड देतो, म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. हजार वॅटचा दिवा घरात बसवून चालेल का? की देवघरातील मिनमिणता दिवा दारात उजेड देईल. दोघांचे स्थान वेगळ असले तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे पाच व्हॅटच्या दिव्याला हजार वॅटची वायर जोडून मोठा करण्याचा प्रयत्न का करायचा? पाल्याची आवड-त्याची बौद्धिक क्षमता, काळाची गरज, याचा सारासार विचार करुनच पाल्याबाबत शैक्षणिक वर्गाची निवड करणे गरजेचे आहे.

Advertisement

स्पर्धेच्या युगात दहावी, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआय, अभियांत्रिकी, मेडीकल, फार्मसी, फिजिओथेरपी, एमबीए, एमसीए, बीबीए, कॉम्प्युटर सायन्स आदी विषयाला प्रवेश घेताना दिसतात. अलीकडे विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेत संशोधन करून स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. यामागे दहावी-बारावीनंतर लगेच नोकरीची संधी मिळावी अशीच विद्यार्थी, पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन, पॅरामेडीकलसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. जेणेकरून लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळावी. यासाठी विद्यार्थी, पालक नेहमीच प्रयत्नशील असतात. बारावीनंतर पदवी, अभियांत्रिकी, लॉ, फार्मसी, बीसीए, बीबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी, मेडिकल, एमबीबीएससह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम हा चांगला पर्याय आहे.

शैक्षणिक व्यवस्थापणही काळानुरुप बदलले आहे. तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा चार वर्षाची डिग्री करताना मध्येच काही कारणास्तव गॅप पडला तर जितके वर्षाचे शिक्षण तशी डिग्री मिळते. उर्वरित शिक्षण पुन्हा पूर्ण करण्याची तरतूद आहे. मॅकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे बेसिक इंजिनिअरींगचे कोर्स आहेत. याला शेकडो उपशाखा जोडल्या गेल्या आहेत. अमूक एक शिक्षण पूर्ण केले म्हणून आयुष्यभर एकाच प्रकारची नोकरी किंवा त्याच साच्यात काम यापुढे कोणी करणार नाही. शॉर्टटर्म कोर्सेसच्या माध्यमातून शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे अमुक एक शाखा निवडली आणि चुकीची ठरली तर काय ? ही चिंता करण्याची गरज नाही असे मत राउंड टेबल चर्चा सत्रात तज्ञ मार्गदर्शकांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.