पोटात ‘बाळ’ घेऊन जन्मले अपत्य...
कर्नाटक राज्यात एक विचित्र घटना नुकतीच घडली आहे. कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) या संस्थेत एका अर्भकाचा जन्म झाला आहे. या अर्भकाच्या पोटात एक गर्भ आहे. यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. अशी घटना अत्यंत दुर्मिळ आहे. या संस्थेत एका महिलेने 23 सप्टेंबर 2025 या दिवशी एका अर्भकाला जन्म दिला. अर्भक आणि माता यांची प्रकृती उत्तम होती. तथापि, नेहमीच्या प्रक्रियेनुसार अर्भकाचे स्कॅनिंग करण्यात आले. तेव्हा त्याच्या पोटात आणखी एक भ्रूण किंवा गर्भ असल्याचे उघड झाले. त्यामुळे डॉक्टर्सही सावध झाले. असा प्रकार लाखो अर्भकांच्या जन्मामागे एखाद्या वेळेस घडतो, अशी माहिती देण्यात आली. वैद्यकीय भाषेत याला ‘फीटस इन फिटू’ असे संबोधले जाते. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. या स्थितीत मातेच्या गर्भाशयात जुळे भ्रूण निर्माण होतात. पण त्यांच्यापैकी एकाची वाढ खुंटते आणि तो भ्रूण दुसऱ्या भ्रूणाच्या शरीरात वाढू लागतो. ही अत्यंत जटील परिस्थिती असते. संपूर्ण जगात आतापर्यंत अशा प्रकारची 200 ज्ञात अर्भके जन्माला आली आहेत. मात्र, अशी अर्भके जिवंत राहण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, अशी माहिती देण्यात आली.
शरीरात आणखी एक भ्रूण घेऊन जन्माला आलेल्या अर्भकाची योग्य वेळेत शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्याच्या शरीरात वाढणारा भ्रूण काढून टाकावा लागतो. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड समजली जाते. अर्भकाच्या शरीरातील भ्रूण नेमका कोठे आहे, त्यावरही शस्त्रक्रियेचे यश अवलंबून असते. 2025 मध्ये महाराष्ट्रतील बुलढाणा जिल्ह्यात एक असे अर्भक जन्माला आले होते, की ज्याच्यात एक नव्हे, तर दोन भ्रूण वाढत होते. या भ्रूणांचे हातपायही विकसीत झाले होते, अशी स्थिती होती. या अर्भकावर विशेष शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यासाठी त्याला अमरावती येथील विशेष सेवा रुग्णालयात नेले होते.