चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दिला 25 लाखाचा धनादेश
सिद्धापूरचे आमदार-कारवार जिल्हाधिकाऱ्यांकडून अक्षता पै. कुटुंबीयांचे सांत्वन
कारवार : बेंगळुरमधील चिन्नास्वामी क्रिडांगणाबाहेर चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या सिद्धापूर येथील त्या महिलेच्या कुटुंबीयांना कर्नाटक सरकारच्यावतीने सोमवारी 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गेल्या 4 जून रोजी आरसीबी विजयोत्सवाच्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील सिद्धापूर येथील अक्षता पै. नावाच्या महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. पै. व्यवसायाने सी. ए. होत्या. शिरसी सिद्धापूरचे आमदार भीमण्णा नाईक आणि कारवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मी प्रिया यांनी आज सोमवारी सिद्धापूर येथे दाखल होऊन पै यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. शिवाय अक्षता यांच्या कुटुंबियाकडे 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अक्षता यांच्या कुटुंबीयांनी सरकारच्या भूमीकेबद्दल असमाधान व्यक्त केले. सरकारने सुरक्षिततेच्या बाबतीत हयगय केल्यानेच उच्च शिक्षण घेऊन सीएची प्रॅक्टीस करणाऱ्या अक्षताला जीव गमवावा लागला असे सांगितले. 25 लाख रुपये खर्च करून सीए झालेली अक्षता परत येणार आहे का? असा संतप्त सवालही केला. किमान आतातरी चेंगराचेंगरीसारख्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी असा सल्ला दिला.
चेंगराचेंगरी अतिशय दुर्दैवी घटना
या प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार भीमण्णा नाईक म्हणाले, चेंगराचेंगरी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडायला नको होती. कर्नाटक विधानसौधच्या समोर कोणत्याही प्रकारची दुर्दैवी किंवा अप्रिय घटना घडली नाही. चेंगराचेंगरी दुर्घटनेला सरकार कसे काय जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित करून नाईक पुढे म्हणाले. विजयोत्सव आयोजकांनी सुरक्षिततेची चोख व्यवस्था ठेवली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती.
पहलगाम-कुंभ मेळ्यातील घटनेचे काँग्रेसकडून राजकारण नाही
भाजपचे नेते कारण नसताना काँग्रेस सरकारला टार्गेट करीत असून, चेंगराचेंगरी प्रकरणाचे भांडवल करीत आहे. हे योग्य नव्हे असे स्पष्ट करून नाईक पुढे म्हणाले, जम्मू काश्मीरमधील पहलगाम घटनेचे किंवा कुंभ मेळ्यातील घटनेचे काँग्रेसने राजकारण केले नाही.