साखर कारखान्यासमोर चार्जिंग लावलेली दुचाकी पेटली
तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न : सकाळी नऊ वाजता घडली
वसंतदादा साखर कारखान्याजवळील कामगार भवन येथे असणाऱ्या गौरीशंकर मंदिराजवळ घरात चार्जिंग लावलेली हिरो कंपनीची इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पण तोपर्यंत ही बाईक जळून खाक झाली. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसंतदादा साखर कारखान्यासमोर कामगार भवन आहे. त्याठिकाणी तेजस गवळी यांचे घर असून त्यांनी त्याच्या मालकीची हिरो कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी सकाळी नऊ वाजता चार्जिंग लावली होती. ही गाडी चार्जिंग होत असताना अचानक पेट घेतली त्यानंतर गवळी कुटुंबिय बाहेर आले आणि त्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित करून या गाडीवर पाण्याचे फवारे सुरू केले. ही आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन विभागाने तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पण तोपर्यंत ही गाडी जळून खाक झाली होती. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात सांगली शहरात इलेक्ट्रिक बाईक पेट घेण्याची ही तिसरी घटना आहे. या इलेक्ट्रिक गाड्या का पेटल्या जात आहेत त्याबाबत आता पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे.