For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदलते चक्र

06:57 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
बदलते चक्र
Advertisement

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या चक्रीवादळाने चेन्नई, आंध्र किनारपट्टीला दिलेला तडाखा जबरच म्हटला पाहिजे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे ‘नेमेचि येतात वादळे’ अशी सध्याची स्थिती असून, वाढती वादळे आणि त्यांची तीव्रता पाहता निसर्गाचे वा हवामानाचे चक्र बदलत असल्याचे दिसून येते. तशी चक्रीवादळे किनारपट्टीच्या भागाला नवीन नाहीत. वेगवेगळ्या चक्रीवादळांच्या चक्रातून या भागातील लोकांना अधूनमधून जावेच लागते. फयान, लैला, निसर्ग अशी कितीतरी वादळे जनमानसाने अनुभवली आहेत. किंबहुना, मागच्या काही वर्षांच्या वादळांची संख्या व त्यांची तीव्रता या दोहोत वाढ झाल्याने त्याचे एकूणच पर्यावरण व जनजीवनावर गंभीर परिणाम होत असलेले दिसतात. वर्षभरात मोचा, बिपरजॉय, तेज, हमून, मिचली आणि मिचाँग अशा सहा चक्रीवादळांशी देशाला सामना करावा लागला. या वादळांमुळे 506 लोकांना प्राण गमवावे लागले असून, 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. यातून त्यांच्या उपद्रवमूल्याची कल्पना यावी. चक्रीवादळे आली, की तेवढ्यापुरती यावर वादळी चर्चा होते. त्याची तीव्रता, बाधितांची वा मृतांची संख्या, निधीचा आकडा, याचे उल्लेख होतात. तथापि, त्यानंतर दुसरे वादळ वा त्याची चाहूल लागेपर्यंत कोणत्याही मोठ्या हालचाली होताना दिसत नाहीत. अलीकडेच मिचाँगने चेन्नईसह तामिळनाडू व आंध्र किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला. या चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीतून भारतातील महत्त्वाचे चौथ्या क्रमांकाचे शहर असलेल्या चेन्नईची पुरती वाताहत झाल्याचे चित्र पहायला मिळते. या आपत्तीत चेन्नई, तिऊवल्लूय, कांचीपूरम्, चेंगलपेट या चार सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यातील 800 हून अधिक ठिकाणे जलमय होतात, 12 जणांना जीव गमवावा लागतो, यातूनच त्याची तीव्रता ध्यानी यावी. मात्र, वादळ शमल्यानंतरही चेन्नई व परिसरातील लोकांची तुंबलेल्या पाण्यातून मुक्तता होत नसेल, तर विकास यालाच म्हणायचे काय, असा प्रश्नही उपस्थित होतो. तसे पाहिल्यास यापूर्वीही अतिवृष्टीच्या संकटाला चेन्नईकरांना सामोरे जावे लागले आहे. परंतु, या साऱ्याला केवळ निसर्गच जबाबदार आहे की अनिर्बंध विकासही यास हातभार लावत आहे, याचाही कुठेतरी विचार करणे क्रमप्राप्त ठरते. अनधिकृत बांधकामे, नैसर्गिक प्रवाह अडविणे, त्याच्यावर भराव टाकून इमारती उभारणे, असे प्रकार बहुतांश शहरात सर्रास पहायला मिळतात. चेन्नई शहरही यात आघाडीवर राहिले आहे. 2015 च्या अतिवृष्टीत त्याची फळे भोगावी लागल्यानंतरही शहराला जाग येत नसेल, तर त्याला काय म्हणायचे? आत्ताच्या आपत्तीपासून तरी येथील प्रशासन व सरकार काही बोध घेणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करीत पाच हजार कोटी रुपयांची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतकार्य सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली. तसेच केंद्राकडून तामिळनाडूला 450, तर आंध्रला 493 कोटीचा निधीही जाहीर करण्यात आला. परंतु, या सोपस्काराच्या पलीकडे जाऊन या आघाडीवर काम करण्याची आज गरज आहे. आंध्रमध्येही या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळित झाले असून, 194 गावांसह 40 लाख नागरिकांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कधी प. बंगाल, ओरिसा, गुजरात, कर्नाटक, कोकण, तर कधी केरळ, तामिळनाडू, आंध्र. असेच हे चक्र आहे. ते टाळता येणार नसले, तरी नुकसान वा हानी टाळणे काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. त्यादृष्टीने हवामानाचा अंदाज हा अतिशय महत्त्वाचा घटक होय. हवामान विभागाकडून वेळीच यासंदर्भातील अंदाज दिला जाणे व त्यानंतर किनारपट्टीच्या भागात तातडीने त्यादृष्टीने कार्यवाही होणे, ही आजची गरज आहे. त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळांपासून संरक्षण करण्यासाठी घरांच्या रचनेत काही बदल करता येतील काय, हेही पहायला हवे. अतिवृष्टीची शक्यता ध्यानात घेऊन प्रशासनाने पाण्याचा तातडीने निचरा होण्याकरिता ठोस पावले उचलायला हवीत. यातून आपत्तीची तीव्रता काही अंशी तरी कमी करता येईल. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालचा उपसागर हा उबदार आहे. त्यामुळे तेथे अधिक चक्रीवादळे निर्माण होतात. मात्र, ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटामुळे अरबी समुद्राचे तापमानही वाढत चालले आहे. त्यामुळे तेथेही वादळांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. आगामी काळात आंध्र, तामिळनाडू, प. बंगाल, ओरिसा राज्यातील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीप्रमाणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या भागालाही चक्रीवादळाचे तडाखे बसण्याचा संभव आहे. स्वाभाविकच त्याची वाट न पाहता आत्तापासून उपाययोजना आवश्यक ठरतात. ‘जागतिक तापमानवाढ’ हा आज अतिशय परिणामकारक घटक ठरला आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, थंडी वा उष्णतेच्या लाटा यापासून निसर्गातील प्रत्येक चढ उतारांच्या मुळाशी हा घटक असल्याचे दिसते. अलीकडेच अवकाळी पावसाने व गारपिटीने महाराष्ट्रासह लगतच्या भागाला दणका दिला. आता अनेक राज्यात थंडीची तीव्रता जाणवत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा हिवाळा उबदार राहणार असून, सरासरी तापमान वाढणार असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. अर्थात ग्लोबल वॉर्मिंगमुळेच हे सारे घडत आहे. त्याचबरोबर तापमानवाढीत सक्रिय झालेल्या एल निनोचीही त्यास मदत मिळत असल्याचे सांगितले जाते. भारतासारख्या देशात पावसाळा, हिवाळा व उन्हाळा असे तीन ऋतू दिसून येतात. तथापि, मागच्या काही वर्षांत या ऋतूंमध्ये सरमिसळ झाल्याचे दिसत आहे. एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव घ्यावा लागल्याची उदाहरणेही अलीकडे वारंवार सापडतात. ऋतू चक्रातील या बदलास पर्यावरणाचा ऱ्हास, अति नागरीकरण, प्रदूषण यांसारखे घटक जबाबदार आहेत, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत नुसत्या चर्चांऐवजी कृतिशीलता दाखविण्याची वेळ आली आहे. बदलत्या चक्राशी लढायचे असेल, तर स्वत: बदलण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीवही प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

Advertisement

Advertisement
Tags :

.