बॅकफूटवर गेलेल्या विरोधकांना ताकद आजमावण्याची संधी
लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार पूर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोकणात सद्यस्थितीत महायुती जोमात आहे. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीतील विरोधकांना या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाची ताकद आजमावण्याची संधी मिळणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गेली साडेतीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर निवडणूक यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी कामाला लागली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, नगर पंचायती आणि महानगर पालिकांच्या निवडणुका गेली साडेतीन वर्षे होऊ न शकल्याने प्रशासकीय राजवट आहे. ही प्रशासकीय राजवट लवकरच संपुष्टात येऊन लोकनियुक्त कारभार सुरू होणार आहे. त्यासाठीच निवडणूक विभाग तयारीला लागला आहे. दिवाळीचा सण संपताच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे.
राज्य शासनाने प्रथमत: प्रभाग रचना केल्यानंतर जि. प. अध्यक्ष पद, पं. स. सभापती, नगराध्यक्ष पद यांची आरक्षणे काढली. त्यानंतर नगर परिषदा व जि. प. आणि पं. स. मतदारसंघांची आरक्षणेही काढली आहेत. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामुळे पुढील दोन-तीन महिने निवडणुकांची रणधुमाळी गाजणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणात महाविकास आघाडीला धोबीपछाड करत महायुतीने वर्चस्व राखले. त्यामुळे महायुती सध्या जोमात आहे. महाविकास आघाडी
बॅकफूटवर गेलेली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना आपली ताकद किती राहिली आहे किंवा किती वाढली आहे हे तपासावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून भाजपचे नारायण राणे, तर रायगडमधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सुनील तटकरे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील विधानसभेच्या आठ जागांपैकी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून एकमेव आमदार म्हणून निवडून आले. उर्वरित सातही आमदार महायुतीमधून निवडून आले आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. पेंद्र किंवा राज्यात महाविकास आघाडीला सत्ता न मिळाल्याने महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांचा महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असल्याने महाविकास आघाडीची ताकद फार कमी झालेली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.
तब्बल साडेतीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट राहिल्याने व निवडणुका न झाल्याने ग्रामीण भागात कार्य करणारे कार्यकर्ते पक्षाच्या पदाव्यतिरिक्त कुठल्याही पदावर न राहता, त्यांना काम करावे लागत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला भविष्यात संधी मिळेल, या अपेक्षेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी झोकून देऊन त्यांनी काम केले. गेली साडेतीन वर्षे केवळ पक्षाचे कामच त्यांनी केले, मात्र त्यांना कुठल्या पदावर जाता आले नाही. परंतु, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने खऱ्या अर्थाने निवडणुका लढवून पदावर जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये आरक्षणे वेगवेगळी पडली असली, तरी इच्छुक उमेदवार किंवा ज्यांना निवडणूक लढण्याची इर्षा आहे, अशा उमेदवारांची पर्यायी मतदारसंघाचा शोध घेऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवून पदापर्यंत जाण्याची तयारी असते, अशा कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याचीही संधी निर्माण झालेली आहे.
कोकणातील महायुतीत घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मधल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षीय पदाव्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही पदे नव्हती. त्यामुळे ही मंडळी फक्त पक्षीय कामात गुंतलेली होती. एकीकडे महाराष्ट्रात सत्तेवर बसलेल्या महायुतीतील सर्वच राजकीय पक्षांकडे अनेक भागात एकापेक्षा एक अनेक उमेदवार इच्छुक आहेत. जिल्हा परिषद, नगर पालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे काही भागात सारेच इच्छुक अशीच स्थिती आहे. इच्छुकांची भाऊगर्दी महायुतीत होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या महाविकास आघाडीमध्ये मात्र इच्छुकांची भाऊगर्दी नसल्याने महायुतीत भाऊगर्दी होऊन तिकिट वाटपात तिकिट न मिळालेल्या नाराज इच्छुक उमेदवारांना महाविकास आघाडीत आयात केले जाऊ शकते. सद्यस्थितीत कोकणात महायुती जोमात असल्याने महाविकास आघाडीमधील पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या निवडणुकांच्या तेंडावर कोलांटउडी मारत महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविताना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
जेथे सत्ता असते, तेथे कार्यकर्ते व पदाधिकारी आकर्षित होत असतात आणि त्या-त्या पक्षांमध्ये प्रवेशकर्ते होत असतात. त्यामुळे कोकणातही महायुतीमध्ये सध्या इनकमिंग सुरू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार, याचीही उत्सूकता आहे. बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद तपासण्याची हीच खरी वेळ आहे, तशीच संधीही आहे. त्याकरिता पक्षांची मोर्चेबांधणी पुन्हा एकदा करावी लागणार आहे. महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्याकडून वेगवेगळ्या मुद्यांवर सत्ताधारी महायुती विरुद्ध अनेकवेळा आंदोलने केली जातात. परंतु या आंदोलनात मोठी ताकद दिसत नाही, असे काही महिन्यांपासून चित्र दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आपली ताकद वाढविण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तरच महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकून राहणार आहे. अन्यथा कोकणात विरोधकांची उरली-सुरली ताकदही संपुष्टात येऊ शकते.
कोकण म्हटलं की, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेना दुभंगलेली असल्याने ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळलेला असून आता हा शिंदे शिवसेनेचा झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच कोकणातून निवडणूक जिंकत आपली ताकद वाढविली आहे. त्यामुळे कोकणात शिंदेसेना व भाजपची ताकद वाढलेली असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजप व शिंदेसेनेतच अधिकाअधिक चुरस निर्माण हाऊन सत्तेसाठीचे दावे केले जाऊ शकतात. या चुरशीमध्ये महाविकास आघाडीतील थोडीफार तग धरून असलेल्या उबाठा शिवसेनेला आपली ताकद दाखविण्याचीही संधी मिळू शकते. त्यामुळे उबाठा शिवसेनेला या निवडणुकीत आपली ताकद तपासावी लागणार आहे. त्याकरिता स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, संघटना बांधणी करणे, लोकांचे प्रश्न सोडविणे, महायुतीत नाराज असलेल्यांना आपल्याकडे खेचणे यासारखे प्रयोग करावे लाणार आहेत, तरच थोडीफार संधी प्राप्त होऊ शकते.
तसेच भविष्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मजबूत विरोधी पक्ष म्हणून सुद्धा भूमिका बजावून आपली ताकद वाढविण्यासाठी आणि पूर्वीचे वैभव प्राप्त करून सत्ता मिळविण्यासाठी या निवडणुकीत आपली ताकद तपासावी लागणार आहे. अन्यथा कोकणात विरोधी पक्षाची ताकदच पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते, असे चित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.
संदीप गावडे