मुंबईला आज राजस्थानचे उट्टे काढण्याची संधी
वृत्तसंस्था/ जयपूर
आयपीएलमध्ये उसळी घेतलेल्या मुंबई इंडियन्सला आज सोमवारी गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करताना त्यांच्या गोलंदाजीच्या समस्या सोडवाव्या लागतील. या दोघांमध्ये झालेल्या मागील सामन्यात राजस्थानकडून जो पराभ स्वीकारावा लागला त्याचेही उट्टे काढण्यास मुंबईचा संघ उत्सुक असेल.
या हंगामात खराब सुऊवातीनंतर गेल्या चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचलेला आहे, तर 12 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झालेल्या राजस्थानचा धडाका चालू आहे. पाच वेळचे विजेते मुंबईने मागील सामन्यात पंजाब किंग्जवर नऊ धावांनी विजय मिळविला होता आणि त्यात तीन बळी घेतलेल्या जसप्रीत बुमराहचा मोलाचा वाटा राहिला होता. 13 बळींसह बुमराह या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळविलेल्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. पण त्याच्या गोलंदाजीतील सहकाऱ्यांना संघर्ष करावा लागलेला आहे.
जेराल्ड कोएत्झीने देखील 12 बळी घेतलेले असले, तरी धावा बऱ्याच दिल्या आहेत. तर आकाश मधवाल आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांना सातत्य दाखविता आलेले नाही. श्रेयस गोपालने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी एक बळी घेतलेला असून अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला मुंबईने गोलंदाज म्हणून वापरण्याची गरज आहे. फलंदाजीत माजी कर्णधार रोहित शर्मा फॉर्मात असून इशान किशन सातत्यपूर्ण राहिलेला नाही. हार्दिकने देखील आतापर्यंत फारसा प्रभाव पाडलेला नाही, तर तिलक वर्माने माफक कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवचे फॉर्ममध्ये परतणे ही मुंबईसाठी मोठी सकारात्मक बाब आहे.
मुंबईसमोर मागच्या वेळी तडाखा देलेला राजस्थानचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा पुन्हा एकदा मोठा धोका असेल. शेवटच्या षटकांत गोलंदाजीची जबाबदारी आवेश खानवर सोपवण्यात येत असून त्याने चांगली कामगिरी केली आहे. कुलदीप सेननेही आपले कौशल्य दाखवले आहे. 12 बळींसह लेगस्पिनर युजवेंद्र चहल हा राजस्थानचा सर्वांत मौल्यवान गोलंदाज आहे, तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला संघर्ष करावा लागलेला आहे. राजस्थानसाठी रियान पराग हा हंगामातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. कर्णधार संजू सॅमसनने देखील संघासाठी काही उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. इंग्लंडचा जोस बटलरही विलक्षण फॉर्मात आहे, पण यशस्वी जैस्वालचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे. शिमरॉन हेटमायरने गरजेनुसार फटकेबाजी केलेली आहे.
संघ : राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोव्हमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका , मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.