For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शतकाचा इतिहास...पारंपरिक वाद्येच खास!

11:15 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
शतकाचा इतिहास   पारंपरिक वाद्येच खास
Advertisement

ढोलताशा, हलगी, झांजपथक, ध्वजपथक, लेझीमला गणेश मंडळांकडून मागणी : बालिकांच्या ध्वजपथकांसह महिलांचे पहिले जगदंब ढोलताशा पथकही कार्यरत

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची सामाजिक परंपरा आहे. सध्या काही प्रमाणात डॉल्बीचा दणदणाट सुरू असला तरी गजर पारंपरिक वाद्यांचाच केला जातो. ढोलताशा, हलगी, झांजपथक, मर्दानी खेळ, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांचा समावेश गणेशोत्सवात सर्रासपणे केला जातो. यावर्षीही गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचाच गजर केला जाणार असल्याने सध्या तयारी जोमात सुरू आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून बेळगावमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. शतकोत्तर परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला सामाजिक परंपरा आहे. प्रबोधनात्मक देखावे व पारंपरिक वाद्य वादनातून मनोरंजन ही आजवरची परंपरा आहे. सध्या काही प्रमाणात डॉल्बीचा वापर होत असला तरी नागरिकांची पसंती पारंपरिक वाद्यांनाच असते. यामुळेच मागील सात-आठ वर्षात बेळगावमध्ये 15 ते 20 ढोलताशा पथके तयार झाली आहेत. मुंबई-पुण्याप्रमाणेच बेळगावमध्ये सूर-तालात ढोलवादन केले जाते. त्यात आता बालिकांच्या ध्वजपथकांचा समावेश झाला आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येईल, तसतसा तयारीला वेग आला आहे. यावर्षी अनेक मंडळांचे आगमन सोहळे असल्याने ढोलताशा पथकांना मागणी वाढली आहे. शाळा-महाविद्यालय व नोकरी सांभाळत ढोलताशांची तयारी केली जात आहे. शाळा, खुली मैदाने, अथवा सभागृहात वादनाचा सराव केला जात आहे.

Advertisement

बेळगावमध्ये नरवीर, आरंभ, मोरया, वज्रनाद, शिवगर्जना, शिवमुद्रा या ढोलताशा पथकांसह रणरागिनी ध्वजपथक तसेच महिलांचे पहिले ढोलताशा पथक असलेले जगदंब यांची तयारी सध्या रात्रंदिवस सुरू आहे. पोशाख शिवून घेणे, नवीन ढोल तसेच ध्वज पथकामध्ये आणणे यासाठीची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने त्यापूर्वी वादनाचा सराव पूर्ण करण्यासाठी ढोलताशा पथकांचा प्रयत्न आहे. सध्या सोशल मीडियावर हलगी वादन चर्चेचा विषय ठरत असून प्रत्येक मिरवणुकीत हलगी वादन केले जात आहे. महाराष्ट्रातील मिरज, सांगली, कोल्हापूर येथील अनेक संघ हलगी वादनासाठी बेळगावमध्ये येतात. मागील दोन वर्षात पोलिसांनी डीजेवर निर्बंध आणल्याने अनेक मंडळांनी हलगी वादन करत फेर धरला. यावर्षी बेळगावमध्येही हलगी मंडळे तयार झाली असून त्यांचाही आवाज मिरवणुकीत घुमणार आहे.

मर्दानी खेळांची क्रेझ

ढोलताशा व ध्वजपथकांसोबतच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही महत्त्वाची ठरत आहेत. शिवकालीन युद्धकला तसेच मर्दानी खेळ सादर केले जात आहेत. बेळगावमधील काही तरुणांनी पुढे येत नवीन मुलांना मर्दानी खेळ शिकविण्यास सुरुवात केली आहे. लाठीमेळा, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला यासह डोळ्यांवर पट्टी बांधून सादर केली जाणारी प्रात्यक्षिके नागरिकांनाही भावत आहेत. त्यामुळे मर्दानी खेळांचाही समावेश मिरवणुकांमध्ये केला जात आहे.

Advertisement
Tags :

.