महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चैतन्याचा सोहळा ......दिवाळी!

06:21 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चैतन्याचा, आनंदाचा प्रकाशकुंज, प्रत्येक भारतीयांच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी. संपूर्ण भारतीय मन ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात असते, तो क्षण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या या चैतन्यमयी पदन्यासामुळे संपूर्ण भारतवर्ष उजळून निघते.

Advertisement

आनंद! गरीब-श्रीमंत, स्त्राr-पुरुष, लहान-थोर, शत्रू-मित्र, उच्च-नीच, जात-पात हे भेद आनंदामध्ये नसतात. आनंद या सर्व भेदांपलीकडे आहे. आनंदाला पर्याय केवळ आनंदच असतो, फक्त आनंद.....!!

Advertisement

हा तर आनंदोत्सव असतो या आनंदोत्सवात सर्व भेदभाव विसरले जातात. सामाजिक, कौटुंबिक व व्यक्तिगत पातळीवरही या आनंदाच्या कक्षा संकुचित होत नाहीत. दुरावलेली मने एकत्र येतात, शत्रू मित्र होतात. सर्वांच्या मनात केवळ एकच उर्मी दाटलेली असते..... आनंदाची.....! केवळ आणि केवळ आनंद.....!!

आंब्याची तोरणे, दारातील सुबक मनमोहक रांगोळ्या, आकाशात झेपावू पाहणारे वेगवेगळ्या आकारातील रंगीबेरंगी प्रकाशाचा आविष्कार करणारे आकाशदीप, आकाशातील नक्षत्रांची स्पर्धा करू पाहणाऱ्या दिव्यांची आरास, घरीदारी झालेली रंगांची उधळण हा केवळ आनंदाचा आविष्कारच नव्हे काय?

चैतन्याचा, आनंदाचा प्रकाशकुंज, प्रत्येक भारतीयांच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी. संपूर्ण भारतीय मन ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात असते, तो क्षण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या या चैतन्यमयी पदन्यासामुळे संपूर्ण भारतवर्ष उजळून निघते. परंपरागत भारतीय मानसिकतेने दिवाळी सणाला पौराणिक संदर्भविश्वात अलगद नेऊन बसविले आहे. श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला तो आनंदाचा क्षण म्हणजेच दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले. त्यावेळी अयोध्या दिव्यांनी उजळली होती, तो दिवस म्हणजे दिवाळी. समुद्रमंथनातून लक्ष्मी व धन्वंतरीची उत्पत्ती झाली म्हणून दिवाळीला सुख समृद्धीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीपूजन करावे तसेच आरोग्यासाठी उपयुक्त अशा औषधांचा योजक म्हणून धन्वंतरीची पूजा, अशी समाजधारणा. त्याला अनुसरून दिवाळी दिवशी इतके दिवे उजळले जातात की, अमावस्येची रात्र पौर्णिमेच्या रात्रीत कधी रूपांतरीत होते, ते कळतही नाही. अख्यायिकेबरोबर दिवाळीला संतांच्या विचारशलाकांचाही स्पर्श झाला आहे. त्यामुळेच संत ज्ञानदेव ‘ज्ञानाची दिवाळी’ अशी अनोखी कल्पना मांडतात. दीप लावून दिवाळी करण्याबरोबरच ज्ञानी होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पेरत जाणे, ही खरी दिवाळी असे ज्ञानदेवांना वाटते. अशी ज्ञानाची दिवाळी श्रोत्यांना प्राप्त झाली की, सर्वांना श्रवणसुखाचा सोहळा अनुभवता येईल. सर्वत्र आनंदाचा अमृतानुभव येईल, असे ज्ञानदेवांना वाटते. म्हणून ते लिहितात, ‘सुर्ये अधिष्ठीली प्राची! जगारानीव हे प्रकाशाची! तैसी वाच्या श्रोतया ज्ञानाची! दिवाळी करी!!

दिवाळी शहर आणि खेडं असा भेदभाव करीत नाही. शहरी झगमगाटाइतकीच खेड्यातील दिवाळी उत्साहाने ओथंबून येते. खेडेगावातील दिवाळीचे चैतन्य शेतशिवारापासून घरादारात हिंदकळत येते. घर, अंगण, गोठा यात दिवाळी प्रसन्नपणे नांदते. सोयाबीन, भात पिकांची मळणी होऊन खळ्यावरची लक्ष्मी दिवाळीदिवशी घरात वस्तीला आलेली असते. गुरे-ढोरे लख्ख धुवून रानफुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालून शेतकऱ्याच्या या दौलतीला मनोभावे ओवाळले जाते आणि घरादाराला बांधलेली रानफुलांची, सोयाबीनच्या शेंगांची तोरणं थंड बोचऱ्या वाऱ्यात आनंदाने खिदळून उठतात.

शेणामातीने सारवलेल्या, हळदी-पुंकवाच्या बोटांनी गंधलेला अंगणातील तुळशीकट्टा उत्साहात भर घालतो. तुळशीच्या मंजिऱ्यासोबत डुलणारं गृहिणीचं

तुळसगाणं तर अप्रतिमच ठरतं.

‘अग अग तुळशीबाळ, तुला अमृताचे अळी, रामानं लावली, लक्ष्मणाने आणली सिताबाईने प्रतिपाळ केला तुळशी आई माझा नमस्कार तुला शंभोशिवहरा करीन तुझी सेवा मोत्याच्या राशी बारशी दिवशी हातात बेलाचे पान मला लागलं शिवाचं ध्यान अग अग तुळशी मी एक आळशी तुला घालीन पाण्याची कळशी

तू म्हणशील केंव्हा केंव्हा तर मला जमेल तेंव्हा साठ होऊ दे पितरांची पापे जाऊदे जन्माची’ हा संवाद दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करतो.

बदलत्या काळाबरोबर दिवाळीला सजगतेचे भान देणे गरजेचे आहे. ध्वनी व हवेचे प्रदूषण करणारे फटाके उडवणं सोडलं पाहिजे. गेल्या काही वर्षापासून प्लास्टिक मुक्ततेबाबत जनजागरण चालूच आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल साध्य होईल. आज अनेक तरुण मंडळे माणुसकीची भिंतसारखे उपक्रम राबवून अनाथ, वंचित, गोरगरिबांना फराळ, कपडे भेट देण्याचे उपक्रम राबवीत आहेत.

दिवाळी पहाटसारखे गायनाचे कार्यक्रम, निसर्ग पर्यटन असे उपक्रम होत आहेतच. दिवाळीचे हे बदलते स्वरूप कृतज्ञता, सभ्यता, मनाची संपन्नता या सद्गुणांचे भरण-पोषण करणारे असेल, तर या बदलांचे स्वागत निश्चितच करावे लागेल. संत ज्ञानदेवांच्या भावविश्वातील ‘ज्ञानाची दिवाळी’ साकारत असेल, तर हे नव्या बदलाचे ज्ञानाचे दिवे जपून ठेवणे समाजहिताचे ठरेल, हे निश्चित !

-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article