गाझामध्ये युद्धविराम लागू
15 महिन्यांनंतर संघर्ष थांबणार : पंतप्रधान नेतन्याहू यांची घोषणा, इस्रायलला ओलिसांची यादी प्राप्त
वृत्तसंस्था/ तेल अवीव
पॅलेस्टिनी शहर गाझामधील इस्रायलचे युद्ध जवळपास 15 महिन्यांनंतर संपले आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने रविवारी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये गाझामध्ये युद्धविराम लागू झाल्याचे जाहीर केले. हमासने ओलिसांची यादी देण्यास उशीर केल्याने युद्धबंदी तीन तास उशिरा लागू झाली, असे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. इस्रायलला ओलिसांची यादी मिळाली असून त्यांची सुरक्षा पडताळणी तपासली जात असल्याचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्याचा मार्ग शोधण्यासाठी युद्धविराम करार झाला आहे. यातील करारानुसार आता टप्प्याटप्प्याने ओलिसांची सुटका करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. करारानुसार पहिला टप्पा 42 दिवसांचा असेल. या कालावधीत ओलिसांची सुटका केली जाईल. सध्या कमी-अधिक प्रमाणात 33 इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. यापैकी तीन ओलिसांची नावे हमासने इस्रायलला दिली असून रविवारी त्यांना सोडण्यात आले.
तीन महिला ओलिसांची सुटका
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा पहिला टप्पा रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून लागू होणार होता. इस्रायली माध्यमांनुसार, हमासने ओलिसांची यादी जाहीर करण्यास विलंब केल्यानंतर सकाळी 11.15 वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्या दिवशी तीन महिला ओलिसांना सोडण्यात आले. तत्पूर्वी, इस्रायली सैन्याने गाझामध्ये बॉम्बहल्ला करण्याचा शेवटचा टप्पा पार पाडत हमासचे लक्ष्य उद्ध्वस्त केल्याचा दावा केला.
नेतन्याहूंच्या मंत्रिमंडळातील तिघांचा राजीनामा
गाझामध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारमधील तीन सहयोगींनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. ते अति-उजव्या पक्ष ओत्झ्मा येहुदितचे सदस्य होते. आपला पक्ष यापुढे सरकारचा भाग राहणार नाही, असे पक्षाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. या पक्षाचे नेते इटामार बेन ग्विर हे नेतन्याहू सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंत्री होते. युद्धबंदी मान्य करून इस्रायलने हमाससमोर शरणागती पत्करली आहे असे त्यांचे मत आहे. गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षातून अद्याप इस्रायलचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही. त्यामुळे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत युद्ध थांबवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.