एका कार्टूनची क्षी जिनपिंग यांना धास्ती
जपानमध्ये विकली जातेय पूह बियरच्या चित्रांची सामग्री
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या कोरोना धोरणांच्या विरोधातील निदर्शनांमध्ये आता कार्टून कॅरेक्टर ‘विनी द पूह बियर’ची एंट्री झाली आहे. जपानच्या डिस्ने स्टोअर मुलांचे पसंतीचे कार्टून पूह बियर हातात पांढरा कोरा कागद घेऊन असल्याचे दर्शविणारे चित्र असलेल्या सामग्रीची विक्री करत आहे. चीनमधील निदर्शकांना समर्थन दर्शविण्याचा हा प्रकार असल्याचे मानले जात आहे.
कोरोना निर्बंधांच्या विरोधात चीनमधील लोक स्वतःच्या हातात पांढरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत. यामुळे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या विरोधाचे पांढरा कागद प्रतीक ठरला आहे. पांढरा कागद हातात पकडलेल्या पूह बियरच्या चित्रासह अनेक प्रकारची सामग्री ऑनलाईन विकली जात आहे. यात टीशर्ट, बॅग, जॅकेट आणि मग इत्यादींचा समावेश आहे. ही सर्व सामग्री डिस्नेच्या मेड प्रोग्राम अंतर्गत निर्माण केली जात आहे. यात लोकांना स्वतःच्या मर्जीनुसार डिस्नेच्या कुठल्याही उत्पादनात बदल करण्याची सूट असते.
2013 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि जिनपिंग यांची भेट झाली होती. दोघांच्या या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात जिनपिंग यांना पूह बियर आणि ओबामा यांना पूहचा मित्र टिगरच्या स्वरुपात दर्शविण्यात आले होते. तेव्हापासूनच जिनपिंग यांची तुलना डिस्नेचे कार्टून विनी द पूह बियरची केली जात आहे.
चीनमध्ये अशाप्रकारच्या थट्टेच्या सुरातील पोस्टवर बंदी घालण्यात आली आहे. जिनपिंग यांना पूह बियरशी जोडणाऱया कंटेंटला बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. तसेच चीनमध्ये या कार्टूनवर तयार करण्यात आलेल्या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली आहे.