जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली
तीन बीएसएफ जवानांना हौतात्म्य : काश्मीरमधील बडगाम येथे भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी एक भीषण दुर्घटना घडली. बडगाम जिल्ह्यातील ब्रेल वॉटरहेल परिसरात निवडणूक सेवेवर असलेली बस डोंगरी रस्त्यावरून घसरल्याने दरीत कोसळली. या अपघातात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान हुतात्मा झाले असून 32 जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमधून 36 बीएसएफ जवान प्रवास करत होते. त्यापैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
काश्मीरमध्ये सध्या विधानसभेसाठी निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून अजून दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी गृहमंत्रालयाकडून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून बीएसएफ जवानांना निवडणूक सुरक्षा सेवेवर तैनात करण्यात आले आहे. याचदरम्यान बीएसएफ जवानांना घेऊन जाणारी बस पर्वतीय मार्गावरील एका अवघड वळणावर दरीत कोसळली. हा बस अपघात बडगामच्या ब्रेल गावात झाला.
अपघातानंतर या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनधारकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीने बचावकार्य राबविण्यात आले. तसेच माहिती मिळताच स्थानिक नागरिकही घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये बीएसएफचे 36 जवान होते. बस उतरणीच्या रस्त्यावरून घसरल्याने दरीत कोसळली. जखमी जवानांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कठुआमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, जवानाला हौतात्म्य
अन्य एका दुर्घटनेत जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे लष्कराचे वाहन दरीत पडल्याने एका जवानाला हौतात्म्य आले. तर 6 जण जखमी झाले आहेत. सुक्राळा माता आश्र्रम रोडवर हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर एमएच पठाणकोट येथे उपचार सुरू आहेत. यापूर्वी राजौरी येथे मंगळवारी रात्री लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळल्याने 4 कमांडो जखमी झाले होते. जखमींपैकी लान्स नाईक बलजीत सिंग यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला होता.