तरुण भारत दिवाळी अंकाची देदीप्यमान परंपरा
दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन : प्रस्थापित आणि नवोदितांच्या साहित्याची मेजवानी
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या तरुण भारत दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवारी सकाळी तरुण भारतच्या हिंडलगा कार्यालयात मोठ्या उत्साहात झाले. दिवाळी अंकाचे संपादन प्रमुख बालमुपुंद पतकी, संपादक विजय पाटील, वितरण व्यवस्थापक अनिल शेलार, लेखा व्यवस्थापक अशोक बेळगावकर, सीएमओ उदय खाडिलकर, प्रॉडक्शन मॅनेजर धैर्यशील पाटील आणि वसुली अधिकारी मेघराज सटवाणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बालमुकुंद पतकी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून दिवाळी अंकातील मजकुराबद्दल सविस्तर माहिती दिली. तरुण भारतची ‘कमी किमतीत भरगच्च मजकूर’ ही परंपरा यंदाही राखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीच्या आणि नवोदित अशा लेखकांच्या वीस दर्जेदार कथा या अंकात आहेत. त्यामध्ये गुरुनाथ तेंडुलकर, सुभाष सुंठणकर, राजेंद्र अत्रे, के. जे. पाटील, संध्या धर्माधिकारी, गौरी भालचंद्र, अनघा तांबोळी, राजस रेगे, अविनाश बापट, अक्षता देशपांडे, डी. व्ही. अरवंदेकर वगैरेंच्या कथा अंकात समाविष्ट आहेत.
कवितांच्या विभागात नवकवी आणि प्रस्थापित कवींच्या मिळून 56 कवितांचा दिवाळी अंकात समावेश करण्यात आला आहे. प्रतिभा सराफ, संजीवनी बोकील, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण दवणे, डॉ. श्रीकांत नरुले, गीतेश शिंदे, हर्षदा सुंठणकर, शरद अत्रे, डॉ. दिलीप पां. कुलकर्णी, कविता आमोणकर, शंकर विटणकर, वैजनाथ महाजन, शमिका नाईक, मोहन पुंभार, मोहन काळे अशा नामवंत आणि नवोदित कवींचा त्यात समावेश आहे.
तरुण भारत दिवाळी अंकाच्या प्रेमापोटी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून लेखक-कवींनी आपले साहित्य पाठविले होते. ज्यांच्या कथांचा या दिवाळी अंकात समावेश करता आला नाही त्यांच्या कथांना तरुण भारतच्या ‘अक्षरयात्रा’ या साप्ताहिक पुरवणीत जागेच्या उपलब्धतेनुसार प्रसिद्धी देण्यात येईल, अशी माहितीही बालमुकुंद पतकी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, लोकप्रिय ज्योतिषी प्रशांत अर्जुनवाडकर यांचे वार्षिक राशिभविष्य हे याही दिवाळी अंकाचे एक प्रमुख वैशिष्ट्या आहे. खजुराहोचा कंदरिया महादेव-हर्षवर्धन जतकर, भारतीय संस्कृतीत घंटीचे महत्त्व-सूर्यकांत कामून आणि सुचिता घोरपडे यांचा तांबुलपुराण हे लेखही माहितीपूर्ण आहेत. ‘काय म्हणते मधली पिढी’ हा परिसंवादही वाचनीय आहे. नितीन पाटील, गुरु खिलारे आणि रणजित देवकुळे यांची मनमुराद हसविणारी व्यंगचित्रे अंकात असल्याने ते या अंकाचे आकर्षण ठरले आहे, असे पतकी म्हणाले.
आकर्षक दिवाळी अंकाची परंपरा तरुण भारतने यंदाही जपली असल्याचे नमूद करून संपादक विजय पाटील यांनी या दिवाळी अंकासाठी योगदान दिलेल्या तरुण भारत परिवारातील सदस्यांचे कौतुक केले. सीएमओ उदय खाडिलकर यांनीही दर्जेदार दिवाळी अंक निघण्यामागे अनेकांचे योगदान असते, असे सांगतानाच दिवाळी अंकाचे नियोजन, जाहिराती मिळविणे ते प्रसिद्धीपर्यंतचा प्रवास कसा असतो हे सांगितले.
या कार्यक्रमाला तरुण भारत परिवारातील विविध विभागातील सदस्य कैलास रांगणेकर, संतोष धोपारे, विनायक पाटील, रूपेश खोत, नरेंद्र रामनकट्टी, सुहास देशपांडे, श्रीनिवास नाईक, हेमा पाटील, पद्मा शेंडे, अनिता उसुलकर, कुंदबाला प्रभू आदे उपस्थित होते.