भावी वधूला करावा लागतो रडण्याचा सराव
विवाहाच्या एक महिन्यापूर्वी रडण्यास सुरुवात
विवाहाला पती-पत्नीचे अतूट बंधन मानले जाते. समाजात विवाह सर्वात आवश्यक आणि पवित्र विधींपैकी एक आहे. सर्वसाधारणपणे विवाहानंतर वधू आणि तिचे कुटुंबीय रडत असल्याचे चित्र दिसून येते. परंतु एका ठिकाणी विवाहाच्या एक महिन्यापूर्वीच भावी वधू रडण्याचा सराव करू लागते.
भारतात विवाहावेळी वधू सासरी जाताना रडत असतात. वधू जेव्हा स्वत:च्या घरापासून दुरावते, तेव्हा तिला तेथील ओढ पाहता अश्रू अनावर होणे साहजिकच आहे. तर चीनमध्ये देखील अशीच एक परंपरा आहे, परंतु ती खूपच विचित्र आहे. यात वधूंना विवाहावेळी रडावे लागते. वधूच्या अश्रूंचा बांध न फुटल्यास तिला मारून रडण्यास भाग पाडले जाते.
चीनच्या दक्षिण पश्चिम प्रांत सिचुआनमध्ये तूजिया समुदायाचे लोक हजारो वर्षांपासून राहत आहेत. तेथे एका विचित्र परंपरेचे पालन केले जाते. ज्यात वधूने विवाहादरम्यान रडणे आवश्यक आहे. 1911 मध्ये क्विंग साम्राज्यापर्यंत या परंपरेच sपालन केले जात होते. परंतु कालौघात ही परंपरा आता संपुष्टात येत आहे. ही प रंपरा ख्रिस्तपूर्व 475 सालापासून ख्रिस्तपूर्व 221 सालादरम्यान सुरू झाली होती. तेव्हा जाओ राज्याच्या राजकुमारीचा विवाह यैन प्रांतात झाला होता. तेव्हा या राजकुमारीची आई रडली होती आणि मुलीला लवकर घरी परत येण्यास सांगितले होत. याचमुळे विवाहांमध्ये रडण्याचा विधी सामील झाला आहे.
रडणे नाही वाईट
वधू न रडल्यास गावात ती थट्टेचा विषय ठरते. लोक तिला कुटुंबातील वाईट पिढी मानतात. अनेकदा तर वधू रडत नसल्यास आई स्वत:च्या मुलीला मारून रडण्यास भाग पाडते. तर दुसरीकडे अन्य प्रांतात जुओ टांग नावाचा रिवाज आहे. त्यात विवाहाच्या एक महिन्यापूर्वी रात्री भावी वधू एका हॉलमध्ये बसून सुमारे तासभर रडून घेते. यानंतर 10 दिवसांनी आई तिच्यासोबत रडू लागते. मग आणखी 10 दिवसांनी आजी, बहिणी, आत्या, मावशी सर्वजण मिळून रडू लागतात. रडण्यासोबत एक खास गाणे वाजविले जाते, ज्यावर सर्वजणी रडतात आणि याला क्राइंग मॅरेज साँग म्हटले जाते.