कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हार न मानणारा फिरकी बहाद्दर !

06:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वोत्तम फिरकीपटू कोण असं विचारल्यास बोट दाखवावं लागेल ते डावखुऱ्या कुलदीप यादवकडेच...असं असूनही त्याला डावलण्याचं काम सातत्यानं चाललंय. याचा ताजा दाखला म्हणजे नुकताच झालेला इंग्लंडचा दौरा...तरीही न थकता, न हरता कुलदीपनं प्रत्येक वेळी जबरदस्त पुनरागमन करून दाखविलंय. संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेल्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत दर्शन घडतंय ते त्याचंच...

Advertisement

संयुक्त अरब अमिरातीची भूमी...आशियाई चषक स्पर्धा...‘त्यानं’ भारताच्या पहिल्याच लढतीत अमिरातीच्या चार फलंदाजांना गुंडाळलं ते सात धावांत आणि 13 चेंडूंत...तोच अपेक्षेनुसार ठरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू...त्यानंतर पाकिस्तानविरुद्धचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’...‘त्यानं’ पुन्हा एकदा मनगटाच्या जादूचं दर्शन घडविलं अन् खात्मा केला तो साहिबजादा फरहान, हसन नवाज नि मोहम्मद नवाजचा...चार षटकं, 18 धावा व तीन बळी...लढतीतील उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला तो ‘त्याला’च...

Advertisement

‘तो’ ठरलाय ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सामन्यात 4 बळी मिळविणारा पहिलावहिला भारतीय फिरकी गोलंदाज. त्याच्याहून चांगली कामगिरी नोंदविलीय ती अफगाणिस्तानविरुद्ध फक्त चार धावांत पाच बळी मिळविणाऱ्या मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं...‘त्यानं’ तीनपेक्षा जास्त राष्ट्रांचा सहभाग असलेल्या एखाद्या टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सात धावांत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली ती संयुक्त अरब अमिरातीविऊद्ध. त्यापूर्वी त्यानं टी-20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना गारद केलं होतं ते नऊ धावांत...त्या उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय, अन्याय सातत्यानं सहन केलेल्या गोलंदाजाचं नाव...कुलदीप यादव...

भारताचा इंग्लंड दौरा...त्यात समावेश पाच कसोटी सामन्यांचा. परंतु प्रत्येक वेळी कुलदीप यादवला बसावं लागलं ते पॅव्हेलियनमधील खुर्चीवर. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी वाटायचं की, कुलदीपला निश्चितच संधी दिली जाईल. मात्र शेवटपर्यंत त्याला ती मिळाली नाही आणि त्यानं देखील अतिशय संयमानं त्याच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं...कदाचित दौऱ्यावरील संघ व्यवस्थापनाला वातावरण त्याच्यासाठी अनुकूल वाटलं नसावं. या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अन् ती म्हणजे ‘रिस्ट स्पिनर्स’मध्ये ताकद असते ती विश्वातील कुठल्याही खेळपट्टीवर जादू दाखविण्याची...

कुलदीप यादवच्या इंग्लंडविरुद्धच्या आकड्यांवर नजर फिरवायचीय ?...2018 मधील तीन कसोटींत त्यानं परतीचा रस्ता दाखविला 13 जणांना. त्यात समावेश ओव्हलवरील एका डावात 40 धावांत 5, तर संपूर्ण लढतीत 113 धावांत 8 फलंदाजांना गारद करण्याच्या पराक्रमाचा...‘साहेबां’ना तो 14 एकदिवसीय सामन्यांत सामोरा गेलाय व खिशात घातलेत 20 बळी, तर 16 ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय लढतींत टिपलेत ते 15 फलंदाज...कुलदीपला कारकिर्दीत अशा परिस्थितीला नेहमीच तोंड द्यावं लागलंय. त्यामुळं त्या ‘मिस्ट्री स्पिनर’च्या वाट्याला आल्या आहेत केवळ 13 कसोटी लढती. त्यानं कारकिर्दीतील पहिल्या कसोटीत धर्मशाला इथं सामना केला तो ऑस्ट्रेलियाचा अन् चार बळी देखील पटकावले...

एकदिवसीय व ‘टी-20’ सामन्यांतील भारताचा प्रमुख गोलंदाज असून देखील कुलदीप यादवला संघांतून अनेकदा वगळण्यात आलंय आणि त्यामागची कारणं शोधणं देखील कठीण...2021 सालची भारतात झालेली इंग्लंडविरुद्धची मालिका आठवतेय ? पहिल्या कसोटीत अक्षर पटेलला खेळणं जमलं नाही अन् संघात असलेल्या यादवलाच संधी मिळणार असं वाटत होतं. परंतु कुणाचं तरी डोकं अती चाललं नि बोलावण्यात आलं ते शाहबाज नदीमला. त्यावेळी असं कारण सांगण्यात आलं होतं की, कुलदीपहून अश्विन, वॉशिंग्टन सुंदर व नदीम यांच्यात लपलीय ती अधिक चांगल्या फलंदाजीची ताकद.

असं वाटायला लागलं की, त्याची कसोटीतील कारकीर्द तिथंच संपणार. विशेष म्हणजे असं असूनही तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी कुलदीप यादव हाच भारताचा पहिल्या क्रमांकाचा फिरकी गोलंदाज. असल्याची ‘गुगली’ही टाकली...आता आशिया चषकात संयुक्त अरब अमिरात व पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यानंतर कुलदीपनं त्याचं अपेक्षेप्रमाणं सोनं केलंय. ‘यूएई’च्या फलंदाजांना शेवटपर्यंत त्याला कोणत्या पद्धतीनं तोंड द्यावं तेच कळलं नाही. त्यानं फलंदाजांना  चेंडूला फसवी उंची देत, वेगात बदल करून, टप्पा बदलून अक्षरश: नाचविलं. मग अमिरातीचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना मान्य करावं लागलं की, खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत नव्हती अन् फलंदाजांसाठी योग्य अशीच होती. पण कुलदीप यादवसारखे ‘रिस्ट स्पिनर्स’ अशा खेळपट्ट्यांचा सुरेख वापर करतात. ‘खरं सांगायचं झाल्यास त्याच्यासारख्या अतिशय उच्च दर्जाच्या गोलंदाजाला यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या फलंदाजांनी तोंडच दिलं नव्हतं’, राजपूत म्हणतात...

कुलदीपच्या संपूर्ण कारकिर्दीत बहुतेक कर्णधारांनी त्याच्या घातक गोलंदाजीकडे दुर्लक्ष केलंय आणि सामना संपल्यानंतर मात्र स्तुतीचा अक्षरश: वर्षाव केलाय. हे विचित्र वाटत असलं, तरी सत्य परिस्थिती आहे ती अशीच. विशेष म्हणजे त्यानं प्रत्येक वेळी पुनरागमन केल्यानंतर मिळालेल्या संधीचं सोन केलंय नि सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब खिशात घालून त्याला वगळणाऱ्या संघ व्यवस्थापनाला सणसणीत चपराक दिलीय...

तो क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांचा विचार केल्यास पाच बळी मिळविणारा एकमेव भारतीय. खेरीज ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वांत जलदगतीनं 50 बळी खात्यात जमा करणारा देखील तोच. कुलदीपनं 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध गयाना इथं कारकिर्दीती फक्त तिसाव्या लढतीत हा मान मिळविला. त्याचा ‘स्ट्राईक रेट’ 11.9 असा असून सरासरी 13.11. भारताच्या ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील पहिल्या 10 गोलंदाजांचा विचार केल्यास यादवनं तिथं स्थान मिळविलंय...2024 सालची ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा...त्यानं तब्बल 14 फलंदाजांचा फडशा पाडला आणि पाकिस्तानचा अव्वल खेळाडू बाबर आझमला देखील त्याला तोंड देणं जमलं नाही...

कुलदीपच्या कारकिर्दीला दुखापतींनी सुद्धा धक्का दिलाय. त्या गोलंदाजाला विश्वचषक स्पर्धेनंतर सामना करावा लागला तो ‘स्पोर्ट्स हर्निया’च्या समस्येचा अन् बाहेर बसावं लागलं ते पाच महिने. पण डगमगणं, निराश होणं माहित नसल्यानं तो 2025 सालच्या भारतानं जिंकलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत एखाद्या वाघाप्रमाणं परतला...कुलदीप यादवनं यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्येही 14 सामन्यांत 7.07 च्या सरासरीनं 15 बळी मिळविले. या सर्व बाबींचा विचार केल्यास त्याला इंग्लंडमध्ये वगळणं बहुतेक क्रिकेट रसिकांना अजिबात पटलं नाही आणि संघ व्यवस्थानापनावर टीकेच्या क्षेपणास्त्रांचा भडीमार झाला...

कुलदीपनं मान्य केलंय, ‘माझ्यासाठी ती एक कठीण परीक्षाच होती. परंतु मला मिळालेल्या वेळेचा वापर केला तो गोलंदाजी नि तंदुरुस्ती सुधारण्यासाठी. मला फार मोठा आधार मिळाला तो भारतीय संघाचे स्ट्रेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे आद्रियान ले रू यांचा. टी-20 लढतीत सर्वांत महत्त्वाचा असतो तो चेंडूचा टप्पा. शिवाय गोलंदाजानं फलंदाजाचं मन ओळखण्याची कला आत्मसात करणं अतिशय गरजेचं’ !

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article