पाकिस्तानात रेल्वेस्थानकावर बॉम्बस्फोट
क्वेटातील आत्मघाती हल्ल्यात 14 सैनिकांसह 26 जणांचा मृत्यू; बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वेस्थानकावर शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलआय) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने हल्ला केल्याची कबुली बीएलएच्या प्रवक्त्याने दिली. या हल्ल्यात मुख्य लक्ष्य मिलिटंट इन्फंट्री स्कूलचे सैनिक होते. हे सैनिक प्रशिक्षण पूर्ण करून जाफर एक्स्प्रेसने पेशावरला जाण्यासाठी क्वेटा रेल्वेस्थानकावर आले असताना स्फोट घडवण्यात आला.
बलुचिस्तानमधील क्वेटा रेल्वेस्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लष्करी केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, सकाळी 9 वाजता पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस टेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मवर जमत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून करण्यात आला. स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघाती स्फोट असल्याचे दिसते.
स्फोटानंतर जखमींना क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ऊग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी इतर ऊग्णालयांमधून डॉक्टर आणि परिचारिकांनाही पाचारण करण्यात आले आहे. ऊग्णालयाच्या माहितीनुसार, सध्या 46 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेक प्रवाशांचा ऊग्णालयात मृत्यू झाल्याचे क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलचे प्रवक्ते वसीम बेग यांनी सांगितले. स्फोटातील बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक मोहम्मद बलोच यांनी सांगितले. तर मृतांमध्ये 14 लष्करी सैनिक आणि 12 नागरिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बॉम्बस्फोटाची घटना जाफर एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच घडली. टेन 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. अपघात झाला त्यावेळी प्रवासी टेनची वाट पाहत होते. स्फोटाच्या वेळी स्थानकावर शेकडो लोक उपस्थित होते. हा स्फोट रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाचा आवाज येताच लोकांची बचावासाठी पळापळ सुरू झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई सुरू केली. मृत आणि जखमींना क्वेट्टा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जखमींची वाढती संख्या पाहता रुग्णालयात आणीबाणी जाहीर करावी लागली. संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह अतिरिक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बाहेरून बोलावण्यात आले.
‘बीएलए’चे कारनामे
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी रेल्वे पूल उडवून दिला होता. यानंतर क्वेटा ते पेशावर दरम्यानची रेल्वेसेवा बंद करण्यात आली. सुमारे दीड महिन्यानंतर 11 ऑक्टोबरपासून दोन्ही शहरांमधील रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर आता 9 नोव्हेंबर रोजी क्वेटाहून पेशावरला जाणारी टेन येण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर स्फोट घडवून आणण्यात आला.
दोषींना सोडणार नाही : पंतप्रधान
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी तातडीची बैठक बोलावून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.